वॉकेथॉन – डॉ. शालिनी चिंचोरे

आजचा रविवार खास होता. आमच्या सोसायटीने वॉकेथॉन ठेवला होता. आदल्या रात्री लवकरच झोपले होते. सकाळी लवकर उठायचे होते ना! तरीसुद्धा खबरदारी म्हणून घड्याळाचा गजर लावला होता. सकाळची कामे झटपट आटोपली. आणि हो.. पोट रिकामे ठेवले. चहा प्यायचा मोह टाळला. फक्त गरम पाणी प्यायले.
सुटसुटीत ड्रेस घातला. पायात स्पोर्ट्स शूज घालून बाहेर निघताना  मी घड्याळात पाहिले. बरोबर सहा वाजले होते. लिफ्टचा वापर न करता जिन्याने खाली उतरले. झपाझप चालून सोसायटीचे मैदान गाठले.

आमच्या सोसायटीचा एक चक्कर अंदाजे एक किलोमीटर आहे. आम्हांला एकूण दहा चक्कर मारायचे होते. मी सुर्यदेवतेला नमस्कार करून चालायला सुरुवातच करणार होते की मला एक बिल्ला देण्यात आला. तो बिल्ला ड्रेसला अडकवून मी चालण्यास प्रारंभ केला. प्रथमतः वेग जरा कमीच ठेवला. दोन चक्कर झाल्यावर वेग आपोआप वाढत गेला. नकळतपणे!
चालता – चालता लक्षात आले की काही जण गट करून चालत आहेत. कोणी जोडीने गप्पा करत अंतर कमी करत होते. लहान मुलांनी हिरीरीने भाग घेतला होता. कोणी मित्रांबरोबर, कोणी आई-वडिलांबरोबर तर कुठे भाऊ-बहीण एकत्र चालत होते. मुलांचा दांडगा उत्साह पाहून मी चाटच पडले!

थोड्या-थोड्या अंतरावर शक्तीवर्धक पेय वाटली जात होती. पाण्याच्या बाटल्यांचे वाटप ही सुरु  होते. जसजसा सुर्य डोक्यावर येत होता तसतसे उन्हाचे चटके जाणवायला लागले. घामाच्या धारा वाहत होत्या आणि तहान लागल्यामुळे घसा सारखा कोरडा पडत होता.
काही जण भरभर चालत होते. कोणी लांब लांब ढांगा टाकत चालत होते. काहींनी डोक्यावर टोप्या घातल्या होत्या. दरम्यान वाटेत  स्त्रियांचा एक मोठा गट भेटला. हा गट मात्र रमत-गमत, हसत-खेळत चालत होता. त्यांना वेगाशी काही घेणं-देणं  नव्हतं. आपण याचा  एक हिस्सा बनलो यातच त्यांना आनंद होता.

कौतुक वाटले ते साठीच्या वर असलेल्या वृद्धांचं! तेही आपल्या परीने, आपल्या हिकमतीने हळूहळू चालत हॊते. त्यातील काही आपली टोपी सांभाळत, मफलर सांभाळत, चष्मा सांभाळत आणि हो अगदी हातातल्या काठीचा आधार घेत चालत होते. त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात होते. त्यांना काय हवं नको ते विचारले जात होते. मध्ये-मध्ये विश्रांती घेण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था केली होती. काही तरुण मुले त्यांची काळजी घेण्याकरिता त्यांच्या आसपास वावरत होती.

एक गोष्ट मात्र नक्की! सर्वजण उत्साहाने व आनंदाने चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उठून दिसत होती. ज्यांना शक्य झाले त्यांनी दहा चक्कर पूर्ण केले ज्यात मी पण होते. काहींना शक्य झाले नाही जसे लहान मुले,वृद्ध मंडळी .. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर समाधान मात्र ओसंडून वाहत होते.

वॉकेथॉन संपल्यावर नाश्ता मिळणार होता. सर्वांसाठी हे एक आकर्षण होतंच. (प्रलोभन म्हणा हवं तर!)  प्रत्येक जण घामाने चिंब भिजला होता. म्हणून जो तो आंघोळ करून मगच नाश्ता करायला गेला.
आम्हां सर्वाना ही वॉकेथॉन लक्षात राहणार होती. दुसऱ्या दिवशी यावर भरभरून चर्चा झाली. सर्वांचे एकच म्हणणे पडले की पुढची वॉकेथॉन केव्हा ठेवणार?
——————————————–
डॉ. शालिनी चिंचोरे

Subscribe to eMagazine updates!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.