सोशल मीडियावर बोलू काही – प्राची रणदिवे

सध्याच्या काळात सोशल मीडिया मानवी जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे . टीव्ही , वर्तमान पत्र ह्या पेक्षा लोकं आजकाल सोशल मीडियावर वाचतात व बघतात . फेसबुक ,ट्विटर ,इंस्टाग्राम ,टिकटॉक सारख्या अप्सवर शेयर करतात .
सोशल मीडिया वर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असा आहे कि लोकं जे नाही आहेत ते भासवण्याचा प्रयत्न करतात . म्हणून सोशल मीडियाचे अनेक फायदे व तोटे आहेत.
लोकांपर्यंत बातम्या लवकरात -लवकर पोचतात व खूप लोकांना एकाच वेळेत संपर्क साधता येतो . एखादी बातमी जर सोशल मीडियावर वायरल केली तर ती कमीत -कमी वेळात जास्तीच -जास्त लोकांपर्यंत पोचते . पण ही बातमी जी वायरल झाली आहे ती खरी आहे कि नाही ह्याचा काहीच पुरावा नाही , त्यामुळे एकादी खोटी व अपुरी माहिति ही लोकांपर्यंत पोचू शकते आणि त्यामुळे गैरसमज व सामाजिक वादविवाद निर्माण  होऊ शकतात.

सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन अभ्यासाला खूप महत्व आहे . सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे मुलांचा घरबसल्याच अभ्यास करावा लागतोय . सगळा अभ्यास  शिक्षकांद्वारे ऑनलाईन पाठवला जातो ज्या मुळे मुलं सतत कॉम्पुटर किंवा लॅपटॉपवर बसतात . असा सततच्या लॅपटॉप व कॉम्पुटर च्या वापरामुळे मुलांचे डोळे बिघडण्याची शक्यता जास्त आहे . शाळेत जाऊन आपल्या मित्र व मैत्रिणी बरोबर शिकण्यात जी मज्जा आहे ती ऑनलाईन अभ्यास करण्यात कुठे आहे . शालेय जीवन हे जीवनातला सगळ्यात अविस्मरणीय भाग आहे . जी मज्जा शाळेत करतो ती मज्जा आपण पुढे आयुष्यात कधीच करू शकत नाही.

सोशल मीडियाद्वारे व्यवसाय वाढायला मदत होते , जास्तीच -जास्त लोकंपर्यंत आपल्या  वस्तू   पोचवता येतात , घरबसल्या आपल्याला शॉपिंग करता येत . हे खूप लोकांना आवडतं ही  पण बाजारात चार -पाच दुकाने फिरून  , दुकानदाराशी घासा-घिस करून वस्तू घेण्यात जी मज्जा आहे ना ती ऑनलाईन शॉपिंग मध्ये नाही . एकादी साडी विकत घेताना आपण अगोदर काही साड्या नेसून बघतो मग एक पसंद करतो , हे सग ळ आपण ऑनलाईन शॉपिंग मध्ये करू शकत नाही . बरेचदा ऑनलाईन दाखवलेली  वस्तू  आणि आपल्याला मिळालेली  वस्तू ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

सोशल मीडिया मुळे आपण इतर बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतो , आपले जुने शाळेचे मित्र – मैत्रिणी , कॉलेजच्या मित्र -मैत्रिणी व इतर अनेक लोकांच्या संपर्कात आपण राहू शकतो पण ह्या लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण सतत ऑनलाईन लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर राहतो व आपल्या घरी असलेल्या आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये असून सुद्धा आपण नसल्या सारखे असतो . सोशल मीडिया मुळे आपला भावनिक गोष्टींकडे बघण्याचा दुष्ट्रीकोन बदलून जातो . आपण कधी-कधी भावनिक होऊन आपल्या मनातल्या गोष्टी फेसबुक , व्हाट्सअँप  इत्यादी वर शेयर करतो ज्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत आपले  वैयक्तिक समस्या लोकांना कळतात . सगळीच लोकं काय आपल्या भल्याचा विचार करतात अस नाही . पण आपण आपले वैयक्तिक गोष्टी लोकांना सांगून आपल्या मनातील  हळवा कोपरा त्यांच्या स्वाधीन करतो.

सोशल मीडियावर आपण काय सांगतो व किती सांगतो ह्याचा संयम बाळगणे खूप आवश्यक आहे . सध्या लोकं डिप्रेशनवर आप -आपली मतं व्यक्त करतात. पण खरोखरच आपल्यापैकी किती लोकांनी डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांची मदत केली आहे किंवा त्यांना धीर दिला आहे . सोशल मीडियावर लिहायला खूप सोप्पं आहे कि गरज पडली तर मी रात्री- बेरात्री ही मदतीला धावून येईन पण किती जणं इतरांसाठी धावून गेली आहेत.

लिहिणं आणि बोलणं खूप सोप्पं असत पण ते अमलात आणणे मात्र सगळ्यांनाच जमेल असं नाही . उगाच तुम्ही किती महान आहेत ह्याचे प्रदर्शन सोशल मीडियावर न दाखवता आपल्या कृत्यात दाखवा . एकत्र बसून किंवा फोनेवर बोलण्यात जो आनंद आहे तो आनंद चॅटिंग करण्यात कुठे आहे . सामोरा-समोर बसून बोलण्याने आपुलकी वाढते , एकमेकांमध्ये जवळीक वाढते व आपण त्या व्यक्तीच्या मनातल्या गोष्टी समजून घेऊ शकतो . ह्या सोशल मीडियामुळे सगळे लोकं आप -आपल्या खोलीत चॅटिंग करत असतात किंवा ऑनलाईन नेट सर्फिंग करत असतात . ह्यामुळे एकत्र जेवण , एकत्र बसून गप्पा मारणे हे सगळ जणू बंदच झालं आहे.

सध्याच्या ह्या काळात जर सोशल मीडिया नसतं तर लोकांचे एकमेकांशी संपर्क तुटले असते आणि ह्या लॉकडाऊन मध्ये आपले हालच झाले असते. सोशल मीडियाचा जर योग्यरित्या, गरजेपुरता व संयमात वापर केला तर ते आजकालच्या पिढीला एक वरदानच आहे.

प्राची प्रधान-रणदिवे

Subscribe to eMagazine updates!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.