दोन घडीचा डाव ….. त्याला जीवन ऐसे नाव – शिल्पा शैलेश अलुरकर


सुशांत सिंग राजपूत – एक देखणं , एक उमदे , आकर्षक व्यक्तिमत्व . अचानक स्वतःचे आयुष्य संपवतो. मीडिया या घटनेचे भांडवल करून आपले पोट भरतात. आपण एक सामान्य नागरिक म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीच करत नाही. या घटनेचा गंभीरपणे विचार कोणीच करत नाही.
 
एक जीवाचा असा अकस्मात शेवट ही बाब एवढी क्षुल्लक आहे का ? कि आपण एवढे भावनाशून्य झालो आहोत? की आपण एवढे निर्ढावलो आहोत की आपल्या आजूबाजूला अजून काही सुंशांत सिंग आहेत हे हि आपल्याला दिसत नाही. जरा विचार करूया…
 
आपल्यापैकी सगळेच नसले तरी खूप जण मध्यमवर्गीय असतील . मागितलेली वस्तू सहसा लगेच कधीही मिळायची नाही . आई चा धपाटा, बाबांचा धाक , शेजाऱयांचे टोमणे , शिक्षकांची बोलणी . मित्रांची मस्करी. हेच आयुष्य होते. एखादी वस्तू मिळवण्यासाठी तडजोड करावी लागायची. मला सायकल हवी होती म्हणून मला सातवीत ८०% गुण मिळवावे लागले होते. माझ्यासाठी हे गुण मिळवणे म्हणजे एवरेस्ट सर करण्या सारखे होते. असो.
 
पण आजकाळ मुलांना सगळेच आयतं , आणि सहज मिळतं. म्हणूनच मिळवण्याची आणि कमावण्याची किंमत कमी झाली आहे . नकार द्यायची आणि ऐकून घ्यायची वृत्तीच राहिली नाही.
 
माझ्या नवतरुण मुलीने, काही दिवसांपूर्वी तारे तोडत मला सांगितले की , तिच्या एका मैत्रिणीच्या खोलीत जायला तिची परवानगी घ्यावी लागते, अगदी तिच्या आईवडिलांना सुद्धा! असा वेडेपणा आपण आपल्या लहानपणी केला असता तर कानाखाली रांगोळी ठरलेली, किंवा किमान शाब्दिक चकमक तरी..
 
एक तर इनमीन दोन खोल्या. फारच नशीबवांनाची एखादी खोली जास्त. त्यात माझी वेगळी खोली कुठून येणार? हे मी माझ्या मुलीला सागितल्यावर तिने एवढा मोठ्ठा आ वासला!  आणि तिला तसे पाहून मी माझ्या स्वभावाविरुद्ध वाद घातला नाही!!
केवढे मोठे आश्चर्य!
 
आपलं तेच खरं , आपण आपल्या मनाचे मालक, बाकी लोकं गेली उडत किंवा ढगात असं आपण आत्तापर्यंत किती वेळा म्हटलं असेल.. पण अजून पर्यंत आकाशात उडत जाणारा एकही  माणूस मी पहिला नाही . 
पण संध्याकाळ नंतर तरंगणारे खूप पाहिलेत. अनेक वेळा खोट्या  प्रतिष्ठेला , अहंकाराला कुरवाळत बसणारी  माणसे दिसतात . ” नैराश्य ” ( डिप्रेशन ) हा शब्द  तर अभिमानाने एकाद्या डिग्री सारखा मिरवतात यश मिळवायला धाडस आणि पचवायला धडाडी लागते . नाही तर यशाच्या उंच शिखराहून कधी आणि कसे खाली घसरलो हे हि कळत नाही.  दिखाऊ , झगमगीत दुनियेत सगळं काही क्षणभंगुर असते.
 
आपल्यापैकी किती जणांनी नैराश्यावर मत केली आणि त्यावर काय उपाय केलेत हे जर विचारले तर काही जण म्हणतील ‘ कसलं नैराश्य ‘? नापास झालो , नोकरी गेली , नातेसंबंधातला दुरावा , एखादा अपघात , जवळच्या व्यक्तीचा मृत्यू , पैशांची ओढाताण .. अनेक समस्या होत्या . पण घरच्यांची मजबूत साथ होती. कुढत बसावे एवढा वेळ नव्हता आणि इच्छा ही .
 
मला अजूनही आठवतंय .. मी बारावीत होते, बाबा काळजीत घरी बसलेले.. काही संजयच्या अधिच आई खंबीरपणे म्हणाली , ” जे होईल ते होईल , कंपनी बंद पडली तर पडू द्या . मी आहे . घाबरू नका.” दुसऱ्या दिवशी बाबा नेहमी सारखे प्रसन्न होते.  ना बाबांची नोकरी गेली , ना कंपनी बंद पडली . परंतु माझ्या बरोबर कुणीतरी आहे, ह्या भावनेने ते संकटाना हसतखेळत सामोरे गेले.
 
काही वेळा कुसुमाग्रजांची  एक कविता आठवते
‘ मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढा म्हणा ‘
 
या नैराश्याच्या हातात हात घालून  जाणारा त्याचा जिवाभावाचा दोस्त म्हणजे ‘ तणाव’ (स्ट्रेस). हा शब्द आमच्या लहानपणी फक्त  डिकसनरी मध्ये होता , आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे .
 
 
बदलती मूल्ये , बदलती जीवनशैली , नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी होणारी तारांबळ माणसाला हतबल करून ठेवते. अगदी मान्य . पण त्याचा एवढा ध्यास घ्यावा कि एकाद्या बैलाप्रमाणे घाण्याला जुंपून घ्यावे . सगळे नुसते धावत आहेत. अजून थोडे पैसे , आणखी मोठे घर , मोठी गाडी..
 
महाराष्ट्राचे लाडके , प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे  पु . ल . देशपांडे म्हणतात  ” उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्यावे. पोटापाण्याचा प्रयोग जरूर करावा. पण तेवढ्यावर थांबू नका. साहित्य , चित्र , संगीत , नाट्य , शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.  पोटापाण्याचा उदयॊग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमवलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल.”.
 
आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक पालक पाहतो जे मुलांच्या प्रगतिपुस्तकाच्या आकड्याहून मुलांची किंमत ठरवतात.  चांगले सुशिक्षित , सुसुंस्कृत समजले जाणारे पालक लहानपणीच मुलांना Rat race मध्ये उतरवतात . जोपर्यंत शक्य आहे, मारून मुटकून फक्त पळवतात. ते लहान मूळ किती तणाव सहन करत असेल . सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर कुठला मार्ग अवलंबत असेल? पळा पळा आणि फक्त पळा.. आज उद्या आणि नेहमी . सहजपणे , शांतपणे जगता येतच नाही का?
 
लहानपणी शाळा,अभ्यास , खेळ , कॉलेज . मोठेपणी नोकरी , विवाह , संसार , मुलांचे संगोपन , तणावातच करायचे का ? जरा थांबून आजूबाजूला बघूया कि , कुणी साद घालताय का ? कुणाला काही गरज आहे का? एक दोन क्षण निवांत बसून मोकळेपणे काही बोलायला समोर कुणी आहे का ?
 
आपण ना काही घेऊन येतो ना काही घेऊन जातो ; पण हा मधला काळ आहे ना त्याला आयुष्य म्हणतात, ते खूप छान आहे.
डॉ . संजय ओक  यांच्या एक लेखात माणसाच्या  आयुष्याच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन केलं आहे. ‘कुणालातरी वाईट वाटतंय आपण खूप चुकलो. आपण माफी मागायला किंवा माफ करायला हवं होत. कुणाला तरी आठवतच नाही आहे कि आपण काय जगलो. जन्मभर मनात अढी  ठेऊन  एखाद्याचा केलेला राग राग काय कामाचा?’
 
अगदी सगळ्यांना माफ करा .. स्वतःसहित , आणि दिलखुलासपणे म्हणा
 
” मैं जिंदगी का साथ निभाना चला गया
हर फिक्र को धुवे में उडत चला गया “
 
सौ . शिल्पा शैलेश अलुरकर
 
 
 
 
 
 

Subscribe to eMagazine updates!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.