मी, अथर्व आणि रामायण-महाभारत – रूपल शाह

संस्कार करने से डर नहीं लगता साहब… सवालों से लगता है।

महाभारत

सीन : द्रोपदी स्वयंवर

मी : अथर्व, बघ हं आता या वर फिरणाऱ्या मास्या चे प्रतिबिंब खाली पाण्यात बघून त्याच्या डोळ्यावर नेम साधायचाय..!

यासाठी ना फोकस आणि काॅन्संट्रेशन खूप महत्त्वाचं असतं…! खूप अभ्यास करावा लागतो, शिक्षकांनी, मोठ्यांनी सांगितलेलं सगळं ऐकावं लागतं……… ……. ……..

(वगैरे आणि जवळपास ५-६ मिनिटांची माझी बडबड.)

अथर्व : मम्मा त्या मास्याला बॅटरी लावलीय का?

मी : (खरं तर माझा कंप्लीट बाऊन्सर गेलाय.. पण उसने अवसान आणून..)

अं.. काय??? 🙄

अथर्व : अग म्हणजे तो मासा, बॅटरी लावलीय म्हणून गोल फिरतोय का ?

मी : नाही, तेव्हा बॅटरी चा शोध लागला नव्हता..🙄

अथर्व : मग तो मासा आपोआप कसा फिरतोय वर ..? 🧐😈

मी : (खरंतर काही उत्तर नाहीये माझ्याकडे..पण लगेच हत्यार टाकेल तर ती आईच कसली?😉)

अं..अं..अमम.. अरे असेल काहीतरी सोय केलेली.. हॅंडल असेल मागच्या बाजूला.. किंवा मग कोणी तरी फिरवत असेल.. 😬

अथर्व : अग पण मम्मा ते इतकं कंटीन्यूअसली कसं फिरतय मग ?

मी : (आता ठेवणीतलं हत्यार बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही😜)

अरे यार अथर्व ते महत्त्वाचं आहे का ; यातून त्यांना काय सांगायचंय ते जास्त महत्वाचं आहे…

आता बघ गपचूप पुढे काय घडतंय ते आणि मलाही बघूदेत!


 

रामायण:

सीन :   ‘कैकई ने रामाला वनवासात पाठवल्यानंतर दशरथाचा मृत्यू होतो आणि मग नंतर कैकई भरत आणि इतर सगळ्यांची माफी मागते आणि सगळे तिला माफ करतात..’

अथर्व : मम्मा, म्हणजे आता ही कैकई परत ‘गूड’ झालीय का ?

मी : तसं नाही तिला आता तीची चूक कळालीय..🙄

अथर्व : पण ती एकदाच का नाही डिसाईड करत की ती गूड आहे की बॅड 😬🙄

म्हणजे ती आधी गूड होती मग मध्ये बॅड झाली होती.. आणि आता परत ती चांगली झाली… काय चाललंय तीचं. 🤦‍♀🙄

मी: देवा …😫 तुच सांग आता …!!

रामायण-

सीन :’इंद्रजीत युध्दभूमीवर जाताना..

मंदोदरी त्याला समजावत असते की तू जाऊ नकोस..!’

अथर्व: तो का जातोय

मी: त्याच्या वडिलांनी सांगितले, आणि त्याच खूप प्रेम आहे त्यांच्यावर ..

अथर्व: पण तो त्याच्या वडिलांची बाजू का घेतोय. ते चूकीचे असूनही. त्याने त्याच्या आईच ऐकायला हवं ना ..

मी : असं काही नाही..

अथर्व: पण आईच पण तर ऐकायचच असतं ना ..

की आई पेक्षा वडिलांना जास्त आदर देतात ..?

सांग न मम्मा??

मी ..🤐🤐😌

म्हणजे थोडक्यात त्याने अत्यंत निरागस आणि त्याच्याही नकळतपणे मला अत्यंत अवघड प्रश्न विचारला… की ज्याचं उत्तर देणं कदाचित आपल्यापैकी कोणालाही आवडणार नाही…!

या एका निरागस प्रश्र्नाने मला मात्र खोल विचारांच्या गर्तेत ढकललं…! काही ‘प्रश्न’ ज्यांची उत्तरे मीच आयुष्यभर शोधतेय,  कांहीं ची उत्तरे इतकी कटू आणि कठोर आहेत की स्वतःशीच कबूल करायला ही मन धजावत नाहीये..!

आई आणि वडील यांतून एक निवडायची वेळ मूळात मुलांवर येऊच नये… आणि दूर्दैवाने आलीच तर त्यांनी कोणाची बाजू घ्यावी…??

‘जो बरोबर असेल त्याचीच..!’ असं आणि इतकं साधं सरळ उत्तर निदान या प्रश्नाचं नक्कीच असू शकत नाही…! परिस्थिती आणि काळ वेळेनुसार याची उत्तरं व्यक्तिपरत्वे बदलतील..! आणि पूरूष प्रधान संस्कृतीत आई बरोबर असली की आईचचं ऐकायचं हे सांगण्याचं धारिष्ट्य आपल्या पैकी बरेच लोक करणार ही नाहीत..!!

असो बघा मी म्हंटल ना.. ते महाभारत संपतं पण आपलं वेगळंच महाभारत सुरु होतं..!!😃

ही फक्त २-३ उदाहरणे आहेत.. खरं तर रामायण आणि महाभारत या मालिका सुरू झाल्यापासून माझ्या आयुष्यातही एक न संपणारी प्रश्नांची मालिका सुरु झाली आहे..! बरं हे आपलं एक तासात एपिसोड संपवून मोकळे होतात.. पण त्यानंतर आमच्या आयुष्यात रात्रंदिवस रामायण-महाभारत सुरू राहतं..! युद्धभूमीवर रामाचे बाण जसे हवेतून अचानक निर्माण होतात ना तसेच याचे प्रश्न सुद्धा केव्हाही, कुठेही, कसेही अंगावर येऊन धडकतात….! 🙄

-पण मग रामाला ३ मम्मा कशा काय..??

-लक्ष्मण आणि राम सख्खे भाऊ आहेत का ??

-दशरथाला तीन वाइफ कशा काय??

-दुर्योधनाचे डॅडू त्याला पनिष का करत नाही, तो इतका वाईट वागतो तरीही..??

-की ते सुद्धा तसेच आहेत..??

-म्हणजे मम्मा डॅडू पण बॅड आणि राॅंग असू शकतात का..???

-मग त्यांना कोण पनिष करतं..?????????????

मी : देवा ssss ,, संस्कार नको पण प्रश्न आवर… 🙏😫

आय नो, हीच सिच्युएशन थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाच्या घरात असेल..!!

तर; अशा अनेक दृष्य-अदृष्य चक्रव्यूहांना रोजच सामोऱ्या जाणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा!

आपल्या घरातले निरागस बाण तेवढ्याच निरागस पणे परतवून लावण्याचं सामर्थ्य आपणांस मिळू दे.. हीच सदिच्छा..!!

यावरून एक मात्र माझ्या नक्की लक्षात आलंय; आतापर्यंतच्या आयुष्यात रामायण-महाभारत कमीत कमी दहा बारा वेळा पाहिलं असेल किंवा वाचलं असेल पण आपल्याला मात्र कधी असले प्रश्न पडल्याच मला आठवत नाही..! आणि पडले असतील तरी आपण आपल्या आई-बाबांना विचारण्याची हिम्मत केली नसेल. कारण, विनाकारण प्रश्न विचारले की आपल्याला १४ वे रत्न तर मिळायचेच पण तो विषय रामायण-महाभारत यावर सुरू होऊन आपल्या सहामाही- घटक चाचण्यांच्या मार्कांवर येऊन थांबायचा.. आणि मग आपला उद्धार ठरलेलाच असायचा..!!

असो आता या वयातही रामायण-महाभारत बघतांना लहानपणाच्या त्या आठवणी जाग्या होतात, ती मजा आठवते.

हा अनुभव खूप छान आहे..! विशेषतः आपल्या मुलांसोबत बघतांना आपण नक्कीच ते जास्त एंजॉय करतोय..! त्यांच्या गुगलीवर आपली सरळ सरळ विकेट गेली तरीही..!!

यासाठी भारत सरकारच्या सुचना आणि प्रसारण मंत्रालयाचे विशेष आभार..🙏 ☺️

 रूपल शाह

Subscribe to eMagazine updates!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.