अशी होतीस तू गं आई…………..!!
लग्नाआधी, अशी होतीस तू गं आई,
बाबांकडून, हट्ट पुरवून घेणारी,
स्वप्नांच्या, स्वविश्वात वावरणारी,
आईच्या, अंगणात बागडणारी,
पदोपदी, आई-बाबांवर हक्क गाजवू पाहणारी,
संसाराचे तत्व, न समजून घेणारी,
नात्यांच्या गोत्यात, न येणारी,
सतत आईच्या, मातृत्वात न्हाऊ पाहणारी !
लग्नानंतर, अशी झालीस तू गं आई !
चिमुकल्याला झोप यावी, म्ह्णून चंदामामाला जागविणारी,
लेकराला स्वप्नांच्या रथामधून, चांदण्यांचा प्रवास घडविणारी,
चॉकेलेटच्या बंगल्याची, परी संगे सैर करविणारी,
छकुल्याचं रडु, गोड नि खळखळत्या हास्यात बदलणारी,
जीवनाच्या खडतर प्रवासांवर, मात करण्या शिकविणारी,
वृक्षापरी पिलांना, सावलीरूपी पदरात सावरणारी,
सागररूपी जीवनांत, नाविक बनून पैलतीरी पोहोचविणारी !
अशी माझी, होतीस वात्सल्यरूपी तू गं आई !
जरी तुज निरोप देऊनी, कित्येक वर्षे लोटली गं आई,
कधीतरी परतशील, अशी आस गं आई,
तरी एक दिसाची मुदत, घेऊन ये गं आई,
वाटते पाहावेसे तुज, डोळेभरून गं आई,
गुज-गोष्टी खूपशा, जमल्या मनात गं आई,
ज्या, कराव्याशा वाटतात फक्त तुज संगे गं आई !
येणे तुज, नाही जमलेच तर गं आई,
मी समजून घेईन, देवालाही तू हवीस गं आई !
तुजविण जीवन जगणे, किती कठीण गं आई,
पण तुझे वात्सल्य, मी नाही विसरले गं आई,
स्मरण्या तुज, गरज ना भासली मातृदिनाची गं आई !
प्रति दिन मज भासे, जणु मातृदिनची गं आई !!
– सोनिया निलेश पार्सेकर