वाट ईथे स्वप्नातील…
सुर्य अस्ताला गेला तेव्हा पारा शून्याच्याही खाली गेला, आणि हा म्हणे कॅनडातला ‘उन्हाळा’ होता.
उद्या सक्काळी सक्काळीच उठून एका विलक्षण सफरीला निघायच होतं. पण रात्रीचा हा थंडीचा
कहर पाहून ती सहल रद्द करावी की काय असं वाटू लागल. खर म्हणजे टॉरान्तोहून निघालो
तेव्हा तिथे स्वच्छ उन पडल होतं. पण आम्ही अल्बर्टा ला पोचलो आणि एकदम गारठलो.
त्यातून ते बोचरे गारेगार वारे…! अल्बर्टा ला ‘लहरी हवामानाचा प्रदेश’ म्हणतात आणि सध्याचं
त्याचं हे रूप त्याच नाव सार्थ करत होतं. आता फक्त गाढगुडूप झोपावं अश्या विचारात
असतानाच फोन वाजला,
“हाय, झोपला नाहीत ना? तुम्हाला भेटायला शॉन आलाय.”, आमच्या अल्पाईन व्हिलेज ची
स्वागतिका मंजुळ आवाजात पण तितक्याच अगम्य उच्चारात म्हणाली.
अरे, पण कोण हा शॉन? असं म्हणे पर्यंतच तो शॉन आमच्या कुटीच्या दारात येऊन ठेपला
देखिल.
“हाय, मी शॉन. तुम्ही उद्या ची जॅस्पर ते बॅन्फ आणि पुन्हा परत जॅस्पर अशी पुर्ण दिवसाची
सहल बूक केलीय ना? मी तुमचा उद्याचा गाईड आणि वाहन चालक सुद्धा! म्हटल तुम्हाला
भेटावं आणि उद्याच्या सहलीची थोडीफार कल्पनाही द्यावी.” ईती शॉन.
“पण थंडी किती आहे! “ मी.
“उद्या छान उन असेल, हवामान खात्याचा अंदाज आहे तसा.”
‘हवामान खात्याचा अंदाज?’ मला कळेना तो खरच म्हणतोय की थट्टा करतोय..? “कारण
आम्ही तर सहल रद्द करण्याच्या बेतात आहोत.”
“छे छे, असं काही मनात पण आणू नका. खरच उद्या अगदी छान दिवस आहे. आणि आपण
ज्या सहलीवर जाणार आहोत ना ती जगातल्या एका अप्रतिम निसर्ग सौंदर्यानी नटलेल्या
महामार्गाची सहल आहे. खरतर मी आतापर्यंत असंख्य वेळा गेलोय त्या रस्त्यावरून पण तरीही
प्रत्येकवेळा ती वाट मला पहिल्यापेक्षाही जास्त सुंदर भासते , आणि मी परत परत त्याच
उत्सुकतेनी तिथे जात राहतो. त्यातून उद्याच्या सहलीमधे फक्त तुम्ही दोघेजण आणि एक
अमेरिकन स्त्री आणि अर्थात मी ईतकेच लोक आहोत. मस्त खाजगी सहल होईल आपली.
तुम्हाला या सहलीत समाविष्ट नसलेलीही काही अतिशय सुंदर आणि माझी खास आवडती
ठिकाणही दाखवीन म्हणतो. तयार रहा उद्या ठीक ७.३० वाजता. आणि हो, आपण कोलंबिया
आईसफिल्ड ला जाणार आहोत. तिथे मात्र गरम कपड्यांची गरज लागेल हां.”
७.३० bवाजता छान उजाडल. उन्हाळ्यामधे सूर्य रात्री अगदी ९ वाजेपर्यंत तळपत असतो त्यामुळे
जवळ जवळ १४ तासांचा पुर्ण दिवस हाताशी होता. पहिलच ठिकाण आमच्या ठरलेल्या
मार्गापासून थोडस हटके होत.
“आपण मलीन लेक ला जातोय”, शॉन म्हणाला.
मलीन लेक हा जॅस्पर मधला सगळ्यात मोठा जलाशय. खळाळत्या मलीन नदीच्या काठाकाठानी
नदीबरोबरच रस्ताही वळणं घेत होता. लेक जवळ आलो आणि समोरच दृष्य बघून अक्षरशः भान
हरपलं. बर्फाच्या टोप्या घालून बसलेली तीन उत्तुंग पर्वत शिखरं आणि मधल्या तिन्ही घळीतून
अलगद झेपावलेल्या तीन हिमनद्यांच्या कवेत, सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात लेक मलीन
झळाळत होता. जणू हिर्यान्च्या कोंदणात जडवलेला पाचूच! पाण्याचा रंग ईतका सुंदर फक्त
चित्रातच पाहिला होता. आणि त्या तळ्याच्या मधलं ते एक चिमुकलं बेट! त्या निसर्गचित्राला
परिपूर्णता आणण्यासाठीच जणू ते तिथे कुणीतरी ठेवून दिल होतं. ‘स्पिरीट आयलंड’ अस त्याच
नाव.
“हे जगातल्या फोटो शौकिनांच लाडक ठिकाण आहे हां.” शॉननी सांगितल. “आणि मलीन लेक ची
गणना जागतिक वारश्यात केली जाते”.
तिथून पाय निघत नव्हता. पण ही तर नुसती चुणूक होती. आजचा दिवस अजून किती आश्चर्य
घेऊन सामोरा येणार होता..?
रस्त्याने एक डौलदार वळण घेतलं आणि मलीन नदी नी आमची साथ सोडली. तीनी आम्हाला पुढच्या
प्रवासासाठी आथबास्का नदीच्या हवाली केलं. या नावाचा अर्थ ‘झाडांनी वेढलेली नदी’. आधी शांत
भासणारी ही नदी पुढच्याच वळणावर अगदी वेगळेच रुप घेऊन आली. खडका खडकां मधून उसळ्या घेत,
पाण्यात भोवरे खेळत ती अचानक १०० फुट खोल झेपावली. ही उंची फारशी वाटत नसली तरी पाण्याचा
जोर ईतका तुफानी की मार्गात आडव्या येणार्या कडे कपारींना कापून काढत प्रचंड घळी निर्माण
झाल्यात. पाण्यातल्या भोवर्यानी खडकांमधेही भोवरे कोरून काढलेत.
आणि या नदीच्या काठाकाठानीच जगातल्या सगळ्यात प्रेक्षणीय रस्त्यांमधे गणला
जाणारा आईसफिल्ड पार्कवे उलगडत जातो. जॅस्पर आणि बॅन्फ या दोन राष्ट्रीय उद्यानांमधून
जाणारी ही सुमारे २३२ किमीची स्वप्नातली वाट! आट्यापाट्या खेळत धावणार्या नद्या,
डावीकडून अथक सोबत करणारे खडे पर्वत, तर उजवीकडून एका मागोमाग उलगडत जाणारे निळे
हिरवे जलाशय! त्या निलवर्णी पाण्यात डोकावून पाहणारी हिम मुकुट घातलेली दुष्प्राप्य शिखरे!
घळी घळी मधून अलगद उतरत आलेल्या आरस्पानी हिमनद्या! सौंदर्याचा खजिना नुसता
उधळलाय! दोन डोळ्यांमधे किती साठवणार आणि मनामधे किती भरभरून नेणार!
हनिमुन लेक या स्वप्नाळू तळयाला ओलांडून पुढे आलो आणि आतापर्यंत संगत करणारी आथबास्का नदी
उजवीकडून वळून निघून गेली. ईथून पुढे आमच्या स्वप्निल वाटेची सखी झाली ती सनवाप्ता नदी.
नदीच्या विस्तीर्ण खाडी प्रदेशातून लहरत बहरत चाललेल्या वाटेवरून आम्ही निघालो होतो
कोलंबिया आईसफिल्ड कडे!
आईसफिल्ड आणि ग्लेशीयर हे दोन शब्द सतत कानावर पडत होते. ग्लेशीयर म्हणजे तर हिम नदी, पण
मग आईसफिल्ड म्हणजे काय? बर्फाचे शेत?
‘बर्फाचे शेत म्हणण्यापेक्षा बर्फाचे भांडार’ म्हणूया, शॉन सांगत होता.
सुमारे ११००० वर्षांपूर्वी पृथीवर शेवटचे हीमयुग अवतरले. संपूर्ण कॅनडा बर्फाच्या खाली होता.
कोलंबिया आईसफिल्ड तेव्हापासून किंवा कदाचित त्याही आधीच्या दोन हीमयुगानपासून अस्तित्वात
आहे. वॉव! म्हणजे ज्या बर्फावर आम्ही आता उभे आहोत ते ‘आईस एज’ मधलं आहे!
या आईसफिल्डवर वर्षाला सुमारे ७ मीटर ईतक्या जाडीचा हिमवर्षाव होतो. युगानुयूगे असा बर्फ
साठून साठून तिथे घट्ट बसलाय. हे बर्फाचे आवरण किती जाड आहे माहितीये, आयफेल टॉवर च्या
उंचीहून ही थोडे जास्तच! तब्बल १२०० फुट!
३२५^२ किमी. विस्ताराचे हे आईसफिल्ड म्हणजे त्याच्यातून उगम पावणार्या आठ हिमनद्यांचा
अखंड हिमस्त्रोत! त्याच्या वैशिष्टपुर्ण भौगोलिक स्थानामुळे त्यातून तीन महासागराना अविरत जल
पुरवठा होतो.
पण एकंदरीतच पृथ्वीच्या वाढणार्या तापमानाचा आईसफिल्डवरही वाईट परिणाम होतोय. दरवर्षी ५-
७ सेंटिमीटर दराने ते आक्रसतय! या वेगानी आणखी २०० वर्षात ते संपूर्ण नाहीस होईल.
त्या निळसर झाकेनी झगमगणार्या विशाल हिम सागराला नजरेत पुन्हा पून्हा साठवून घेतले. आणि
जड अंत:करणानेच पाय उचलले.
ईथल्या नितळ जलाशयांचे पाणीही निळसर हिरव्या मिश्र छटांचे आणि या आईसफिल्डचाही तो मन
लुभावणारा निलवर्णी शृंगार! पण हा रंग असा ईथे कोणी उधळलाय?
“पेयतो लेक पहा तर आधी. तो तर केवळ स्वर्गीय आहे! मग सांगतोच या रंगाच गुपित.” शॉन नी
आणखीनच रहस्यात भर घातली. अपार उत्सुकतेनी परत एकदा ती वाट वळणांची गाठली आणि
निघालो पेयतो लेक ची गळाभेट घ्यायला.
एका घुमावदार वळणावर अर्ध चंद्राकृती खडा कडा सामोरा आला. त्या कड्यावरून अतिशय तलम,
पारदर्शी, नाजुकसा धबधबा जमिनीवर हळूवार उतरला होता. खर म्हणजे त्याच्यासाठी धबधबा हा जरा
राकटच शब्द आहे. एखाद्या मुग्ध रमणीच्या मुखड्याला झाकणारे लज्जावगुंठनच जणू! ब्रायडल वेल
फॉल असच अगदी सार्थ नाव होतं त्याच!
शॉन आता गाडी जरा कमी गतीनी हाकत होता. आम्ही वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या
जंगलातून मार्गक्रमण करत होतो. तसे एल्क जातीच्या उंच्यापुर्या हरणांचे कळप जॅस्पर
गावातही दिसले होते. पण मला इच्छा होती ती कॅनेडियन रॉकिज ची शान समजल्या जाणार्या
ग्रीझली अस्वलाना पहायची.
पण तो योग नव्हता बहुधा. कारण एल्क हरणे आणि ग्रीझली अस्वलांमधे एक प्रकारचा करारच
असतो म्हणा ना. एल्क जमिनीवर उतरले म्हणजे अस्वले उंच डोंगर कपारींमधे निघून
जातात.
पेयतो लेकला पाहिलं आणि त्याच्या प्रेमातच पडलो! आतापर्यंत कितीतरी देखणे जलाशय पाहून
झाले होते. पण याचा दिमाख काही वेगळाच होता. पाण्याच्या रंगाचे वर्णन करायला तर शब्दही
अपुरेच पडतील. पाचु सारख्या हिरव्या डोंगर रांगानी आणि हीर्यासारख्या पेयतो हिमनदीनी
वेढलेल्या बेचक्यात हा नीलमणी खुलून दिसत होता.
उन्हाळ्यात सगळ्या हिमनद्या खळाळून वाहात असतात. खडकांवरून वाहताना त्या खडकांचा
भुगा करत येतात आणि हा सगळा पिठ सदृष्य चुरा पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबरच
तलावाच्या पाण्यात लोटला जातो. खडकाचा भुगा तलावाच्या तळाशी साचून राहतो. त्यात
नैसर्गिक रित्याच नील हरित कण असतात आणि या कणा कणा वरुन सूर्यप्रकाश परावर्तित झाला
की अवघा जलाशयच निळ्या हिरव्या रंगानी लखलखून जातो. या सगळ्याच तलावांच्या रंगाचं हे
रहस्य होतं तर!
स्वप्नमय वाटेवरचा हा प्रवास आता संपत आला होता. तीन बहिणींच्या शिखरानी वेढलेला बो
लेक, बर्फांचे मुकूट घातलेल्या तब्बल दहा पर्वतानी कडं केलेला मरीन लेक मनावर अमीट छाप
उमटवत एकामागून एक मागे पडले आणि लेक लुईस नजरेच्या टप्प्यात येऊन ठेपला.
मनात अचानक एक अकल्पनीय हुरहूर दाटून आली. ही गाणारी, रंग उधळणारी वाट खरतर कधी
संपूच नये, अशीच उलगडत जावी आणि हा प्रवास अनंत काळापर्यंत असाच बिनघोर सुरु असावा!
“राह बनी खुद मंझील…” .
“काय गुणगूणते आहेस? तुमच्या भाषेतलं गाणं आहे का हे? काय अर्थ आहे त्याचा?” अजून त्या
वाटेवरच हरवलेल्या शर्ली नी विचारलं.
“ हेच ग, म्हणजे …जर्नी इज आवर डेस्टिनेशन.. अस काही तरी” मी.
“पण किती खरं आहे ना” . भारावून उद्गारली ती. आणि परत तिची ती निळीशार नजर त्या
निळ्या पाण्यात मिसळून गेली.
By :
Arti Seludkar