व्हेंटिलेटर…!!
सखाराम नगरपालिकेत पाणी विभागात कामाला असलेला एक अत्यंत साधा आणि सरळ माणूस. बायको संसाराला हातभार लागावा यासाठी शिलाई मशीन वर चाळीतल्या बायकांचे ब्लाऊज शिवणे, साडीला ‘पिकोफाँल’ करुन देणे, जुन्या कपड्यांना रफ्फू करून देणे असे करत त्यांचा संसार अगदी सुखात चालला होता.
पदरात एकच मुलगी, ती ही नुकतीच दहावी ची परिक्षा देऊन आईला घरकामात हातभार लावत होती. सखारामचा दिवस तसा भल्या पहाटेच सुरु व्हायचा.तो पाणी विभागात कामाला असल्याने, विभाग वार पाणी सोडायचं काम त्याच्या वर होते.
त्याचं आपलं रोजच कामावर जाणे-येणे चालुच होते. बाहेर लाँकडावुन होता.सखारामचे काम सुद्धा एका अत्यावश्यक सेवेत मोडत होते. तो आपले काम चोख पार पाडत होता. अशातच, एके दिवशी त्याचा सहकारी चहा पिता-पिता मोठ्याने खोकत होता. सखारामला संशय आल्याने, तोंडावरील ‘मास्क’ सरळ करून त्याला काय होतंय इत्यादीची चौकशी करु लागला.
“काही नाही रे… काल पासुन थोडंस घशात खवखवल्या सारखं होतय…!” ते ऐकून सखाराम थोडासा लांबच झाला. त्याला माहिती होते, बाहेर कोरोनानं काय थैमान घातलय ते..! तो रोज बातम्या वर्तमानपत्रांमधून पाहत, ऐकत होता. त्याला माहिती होते कोरोनाची लक्षणे काय असतात ती..!
आपल्या सहकार्याची ‘ती’ अवस्था पाहून सखारामने पुढची वेळ न दवडता त्याला दवाखान्यात जाऊन कोरोना ची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. एव्हाना, सखाराम देखील मनातुन खूप घाबरला होता.कारण ते सकाळच्या पाळीत दोघेच एकमेकांसोबत होते…!
सखाराम दुपारी घरी आला ‘फ्रेश’ होऊन तो जेवायला बसला पणं, त्याला जेवण गोड लागेना, रोज दुपारी जेवणानंतर दोन तास आराम करणाऱ्या सखारामला आज झोप पणं येत नव्हती. रोज बेफिकीर होऊन घोरत पडणारा सखाराम आज काही केल्या झोपेच्या आधीन होऊ शकत नव्हता,
त्याला राहुन राहुन तो खोकणारा त्याचा सहकारी मित्र दिसत होता.
संध्याकाळच्या वेळी चहा घेता घेता सखाराम ने मित्राला फोन केला आणि त्याची चौकशी केली की, डॉक्टरांकडे गेला होतास का? कोरोना ची टेस्ट घेतली का? त्याने देखील “हो आताच चेकअप
करुन आलो असे सांगितले. एक दोन दिवसांनी सखाराम ला ही वाटायला लागलं की आपण देखील चेकअप केल तर, काय फरक पडणार आहे?
पैसै तर द्यावे नाही लागणार मग काय हरकत आहे? त्याच दिवशी कामावरून सुटल्यावर सरळ तो हाँस्पिटलला गेला. कुठे आणि काय काम करतो इत्यादी सगळ सांगुन झाल्यावर. तेथील वैद्यकीय स्टाफ ने त्याचा ‘स्वँब’ चेकअप साठी घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी याचा रिपोर्ट मिळेल असे सांगून त्याला घरी जाण्यास सांगीतले.
तसा सखाराम आज निश्चिंत होता.कारण आज तो चेकअप करून आला होता. नुसत चेकअप करुनच तो इतका खुष होता की मला काय झालच नाही! या अविर्भावात तो वागत होता, पण नियतीने त्याच्या समोर नविनच काहीतरी मांडून ठेवल होते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक रुग्णवाहीका सायरण वाजवीत चाळीत शिरली…तशी सगळ्या चाळीतीली लोक आपापल्या दार-खिडक्यांमधून आज कुणाचा नंबर लागला आहे हे उत्सुकतने पाहत होते. सायरण बंद झाला आणि तिघेजन रुग्णवाहिकेतुन खाली उतरले. तशी त्यातील एक नर्स समोरच्याच खिडकीत उभ्या असलेल्यांना विचारायला लागली की सखाराम पारधी कुठे राहतात..?
हे ऐकताच बाजूच्या खिडकीत बसलेला सावंताचा तान्या जोरात किंचाळून म्हणाला, “ते बघा वरच्या माळ्यावर डाव्या हाताची शेवटची खोली…” तसा अंगात घातलेला तो पीपीई कीट संभाळत ती नर्स वरती गेली.सखाराम एकटांच वटनात असलेल्या खुर्चीत डाव्या हातात चहाचा कप तर उजव्या हातात पेपर घेवून वाचत बसला होता.
त्याला त्या नर्सने विचारले,
सखाराम कोणं… ?
सखाराम : मीच मँडम, बोला..!
तुम्ही परवा चेकअप केला होता ना…?
हो..! पण रिपोर्ट आज येईल…!
“…चला तर मग, तुम्ही कपडे, टुथपेस्ट, साबन वैगेरे घ्या आणि चला आमच्या बरोबर…! तुमचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे…!”
हे ऐकताच त्याच्या हातातला तो चहाचा कप निसटून खाली पडला, त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली, पायाखालची वाळुच सरकली,त्याची बायको आणि पोरगीने तर हंबरडाच फोडला.आजुबाजचे लोक आपापसात कुजबुजायला लागले.जो सखाराम आख्या चाळीत फेमस होता.जे लोक त्याची चेष्टा मस्करी करायचे तेच लोक आज ओळख दाखवायची सोडा, अवाक्षरही बोलत नव्हते.
सखाराम ची पोरगी रडत रडतच त्याला एकदम येऊन बिलगली, तशी ती नर्स बोलली त्यांच्या पासून लांब रहा…! पाच दहा मिनिटापुर्वी ज्या मुलीने आपल्या जन्मदात्या बापा सोबत दंगामस्ती केली होती, त्या बापाला आता पोरगी शिवू पण शकत नव्हती.
ज्या बायकोने सात फेरे घेऊन जन्मभर साथ देईन म्हणून वचन दिले होते ती बायको आता दोन मिनिटात परकी झाली होती. हे सर्व त्याच्या बायकोला न पटण्यासारखे होते पण; सत्य हे सत्यच असते. ते स्वीकारता आले पाहिजे.
सखारामने नर्स नी दिलेला मास्क तोंडावर बांधला, बायकोने दिलेली कपड्याची पिशवी घेतली.रडुन रडुन तोंड सुजलेल्या लेकीकडं मायेनं बघीतलं, बायकोने लांबुनच खाली वाकुन नमस्कार केला आणि सखाराम पायऱ्या उतरु लागला. त्याला एक एक पायरी म्हणजे एक एक डोंगराएवढी वाटायला लागली होती.गल्लीत चिट-पाखरु नव्हते, होती ती फक्त रुग्णवाहिका आणि ते तिघे..!
सखे सोबती, ईस्टमित्र,पै-पाहुणे, सर्व गोतावळा असुन ही कुणीही आज साथ देत नव्हते.सारं काही असूनही काही च नसल्यासारखं, गाडीत बसायच्या अगोदर एकदा सखाने डोळे भरून आपल्या बायको, मुलीला आणि गल्ली-गोतावळ्याला पाहिले. त्याच्या नजरेत आपण कधी परत येणारच नाही या गल्लीत हा भाव त्या भेदक नजरेतुन दिसत होता.
त्याच्या डोळ्यातुन आसवं गळायला लागली सर्व चाळ त्याला पाहत होती.पण धीर द्यायला मात्र कुणीच नव्हते फक्त त्या नर्स शिवाय..! ‘बाबा, तुम्ही व्हाल बरे लवकरच, याल परत, बसा गाडीत. त्याला हि बर वाटल. खुप वेळानंतर त्याला कुणीतरी लाख मोलाचा सहारा देत होते. सखारामने रुग्णवाहिकेत बसण्या आगोदर आणखी एकदा मागे वळुन पाहिले आणि तो आत जावुन बसला. सायरण वाजवत रुग्णवाहीका रुग्णालयाकडे गेली आणि चाळीभर एकच बातमी वाऱ्यासारखी पसरली, ‘सखाराम ला कोरोना झाला…’
सखाराम ईकडे हाँस्पिटलला आला. आठच खाँट असलेल्या हॉस्पिटल मध्ये आणि त्यातील एका खाँटवर त्याची व्यवस्था केली होती. डाँक्टर, नर्स, सफाई -कामगार, आयाबाई सगळेच कसे PPE कीट मध्ये होते, ते पाहुन त्याला ही कसेतरीच वाटत होते.
डॉक्टरनी त्याला चेकअप वैगैरे करुन गोळ्या औषध दिली इतका सर्व ताण-तणाव असुन देखील डॉक्टराचां स्वभाव मात्र प्रेमळ होता, इतके पेशंट असूनही कुणावर खेकसणे नाही, सर्वांशी चांगले बोलुन ते कसे लवकर बरे होतील याकडच लक्ष होते सगळ्यांचे.सखारामला आज येऊन चार दिवस झाले होते. आता त्याला धोडा त्रास जाणवु लागला होता. घशाला होत असलेल्या खवखवी मुळे आणि ताप थंडी मुळे त्याची ही तब्येत जास्तच खालावली होती. दर तासाला नर्स, डॉक्टर येऊन चेक करुन जात होते.दर तासाला येणाऱ्या डाँक्टर ला पाहुन सखाराम चा धीर सुटायला लागला होता. मलाच का सारखे चेक करतात? बाकीच्याना का करत नाहीत? या असल्या विचारांनी तो जास्तच काळजी करायला लागला.
आठव्या नवव्या दिवशी श्वास घ्यायला जास्तच त्रास होऊ लागला. तसा डॉक्टरांनी त्याला ‘व्हेंटिलेटर’ लावण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जवळ भलमोठ व्हेंटिलेटर आणले गेले. ते पाहून तर तो गर्भगळीत झाला होता. बारा तेराव्या दिवसांनी त्याचा बेड शिफ्ट केला गेला. आता त्या रुम मध्ये फक्त दोनच पेंशट होते.बाहेर च्या वाॅर्डमध्ये लोक तरी होते.पण या इथे लोक सोडा हाँस्पिटलचे कर्मचारी सुद्धा कोण दिसत नव्हते.संध्याकाळ झाली की त्याला मुलगी व बायकोची आठवण येत असे. काय होईल माझ? मी आल्या पासून कुणीच भेटायला आल नाही? माझी आठवण येत नेसेल का त्याना? यासारखे विचार करून तो दरवाजाला आसणाऱ्या काचेकडे एकटक बघत बसायचा, कुणीतरी आपल्याला भेटायला येईल या भोळ्या आशेन…! माझ काय बरं-वाईट झाल तर काय होईल माझ्या मुलीच? कशी संभाळेल माझी बायको स्वतःला? यासारखे नको नको ते विचार त्याच्या डोक्यात येत होते.
एका संध्याकाळी डॉक्टर प्रतिक त्या वाॅर्डमध्ये रांऊड घेत होते. त्यांच्या सोबत ईतर ही स्टाफ होता. डॉ. प्रतिक हे सखाराम रहायला होता त्या भागात प्रतिकच्या, वडीलांची डिसपेंसरी वजा छोटासा दवाखाना होता. सखाराम आणि त्याच्या घरातील सर्वजण डॉ. प्रतिकच्या त्या दवाखान्यात कधी कोण आजारी पडले तर जात होती. त्यामुळे डॉ. प्रतिक ला सखाराम नावानीशी ओळखायचा.डॉ. प्रतिक ला पाहुन सखाराम ला बर वाटल. डॉक्टर त्याच्या जवळ येताच सखाराम च्या डोळ्यात पाणी आले डॉक्टर नी त्याला ओळखल,मामा तुम्ही पण आलात काय…? काळजी करु नका. रडायच नाही, लवकर घरी जायच आहे ना, मी सोडतो तुम्हाला लवकर घरी, पण एका अटीवर, दिलेली औषध आणि जेवन पोटभर खायच आणि आराम करायचा.चार पाच दिवसात बरे व्हाल तुम्ही! डॉ.प्रतिक त्याचे पेपर चेक करत करतच बोलत होते.अस म्हणून ते बाजूच्या पेंशट ला चेक करायला गेले. डाँक्टर नी दिलेल्या टीप्स म्हणजे जणु हनुमंताने लक्ष्मणानाला दिलेली संजीवनी बुटीच आपल्याला मिळाली की काय असे त्याला वाटू लागल.त्या दिवसापासून रोज राऊंड ला आलेले प्रतीक डॉ. सखारामशी वेळ काढून बोलु लागले.त्यांला लावलेला तो व्हेंटिलेटरवर ही काढण्यात आला. हाताला सलाईन, तोंडावर मास्क असलेला सखा आता जरा रिलेक्स वाटत होता.
डॉ. आपले काम आटोपून सखाराम जवळ दहा मिनिटे घालवायचे त्याला “विल पावर” चे महत्व समजावून सांगायचे.घरचा कर्ता पुरुष तुच आहेस. तुला जगायचचं आहे. तुझ्या मुलीसाठी, बायकोसाठी. तो ही ते सर्व ऐकायचा,दिलेल्या गोळ्या, औषधे वेळेवर घ्यायचा.
व्हेंटिलेटर काढून आज तीन दिवस झाले होते. सखारामला आज जनरल वॉर्डमध्ये आणले होते. खुप दिवसांनी तो इतकी माणसं बघत होता. रोज शेकड्याने लोक भरती होत होते.आणि बरे होऊन जात ही होते.डाँक्टर नावाचे देवदूत आपल्या परीने, कसोशीने प्रयत्न करत होते. ज्याच्या नशीबाची दोरी घट्ट होती तो जगत होता.एके दिवशी, संध्याकाळी डाँक्टर नी सखाराम चे वजन, ऊंची, ताप सर्व काही चेक केले आणि स्वतःची कपडे घालायला सांगितली. सखाराम आज जवळ-जवळ २९ दिवसानी स्वतःची कपडे घालत होता.
तो कपडे घालुन येईपर्यंत डाँक्टर नी त्याला गोळ्या,औषधे सर्व बांधून दिले होते. सखाराम हा डॉ. प्रतिक पेक्षा वयाने मोठा होता. पण त्याने निसंकोचपने डाँक्टरांचे पाय धरले आणि तो रडु लागला. तसा कणखर असणारा डॉ. प्रतिक च्या डोळ्यात पण पाणी आले होते. तसे डॉ. बोलले मामा हे तुम्ही करुन दाखवलयं मी नाही. यात माझं काही नाही. एखाद्या पेंशटची सर्जरी यशस्वी झाली की होणारा आनंद त्या डाँक्टर च्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो, अगदी तसाच आंनद आज डॉ. प्रतिक यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सखाराम ला डाँक्टरानी सावरल होते. त्याला जगण्याची नवी उमेद दाखवली होती. त्या उमेदीवरच तो बरा झाला होता. डाँक्टराची गाडी आली. डॉक्टर स्वतः गाडी चालवत होते. सखाराम मागच्या सीटवर बसला होता. त्याला काय करु आणि काय नको? अस झाल होतं. मनातुन सखाराम त्या डाँक्टर रुपी देवाला धन्यवाद देत होता. त्यांचे आभार मानत होता.
काही वेळातच गाडी सखाराम राहत असणाऱ्या चाळीत शिरली. जशी गाडी आत आली तशी माणसं, मुलं सर्वच जन टाळ्या वाजवायला लागले. पहिल्या दुसऱ्या माळ्यावरुन त्याच्यावर फुलांचा वर्षाव होत होता. त्याला कायच समजेना, ज्या दिवशी गेलो होतो, त्या दिवशी हिच लोक संशयास्पद बघत होती तेच आज माझा आनंदाने माझे स्वागत करत आहेत.
सखाराम ची बायको आपला धनी सुखरूप आला म्हणून पंचारती ओवाळायला पुढे आली. तसा सखाराम बोलला माझी नको या देवाची पुजा कर…
अग आज तुझा मालक जिवंत आहे तो या देवाच्या कृपेने, त्याने निस्वार्थीपणे केलेल्या सेवेमुळे मी जिंवत आहे…….
आज देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्दार या सारखी प्रार्थना स्थळे बंद आहेत. पण त्यातील देव मात्र डाँक्टर रुपात दवाखान्यात सदैव तत्पर सेवा देत आहेत…..
खरच सलाम आपल्या डाँक्टरी पेशाला……
प्रकाश मारुती नावलकर
दोहा कतार.