“उन्हाळ्याची सुटी आणि मी “
उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की मला सगळ्यात आधी आठवतं ते माझं बालपण. माझ जन्मगाव रिसोड, आताच्या वाशीम जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. तेव्हा ते लहान अस गाव होतं. लहान इतकं की, जिथे सर्व एकमेकांना नाव, पत्त्यासहित ओळखायची. “हा मुलगा” अमक्याकडे पाहुणा म्हणून आलाय, इतपत माहितीहि गावातील लोकांकडे राहत असे. गावात सुधारणेला खूप वाव नक्कीच होता, पण गावातील लोक मात्र फारच चांगली. सर्व जाती, धर्माची लोकं इथे गुण्यागोविंद्याने राहत होती. गावात पदोपदी मंदिरे होती आणि आजही तशीच आहेत. एक/दोन रस्ते (त्यांना आम्ही मेन रोड म्हणत होतो) सोडलीतर, गावातील बहुतांश रस्ते धुळीने माखलेली असायची. विदर्भातील, गाव असल्याने उन्हाशी आमची खास गट्टी. सकाळी ११ ते ४ ह्या वेळेत एखाद – दुसऱ्या कुत्र्याचा अपवाद वगळता रस्त्याने कुणीही दिसणार नाही.अर्थात, दुकाने,बाजार,व्यवसाय,शेतीकाम हे सर्व सुरु असायचे, पण उन्हामुळे वर्दळ तशी तुरळकच. माझ्या लहानपणी पाण्याचा दुष्काळही आमच्या सोबतीला असायचा. त्यामुळे “पाण्याला जीवन का म्हणतात”, हे त्या आणि तश्या कित्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्यातच मला उमगले. पण माझ्या वाढत्या वया सोबतच, गावातील पाण्याच दुर्भिक्ष कमी होत गेलेलं मला आठवतं.
अशा उन्हाळ्यातील सुटीत, साधारणपणे मी आणि माझ्यासारखी समवयस्क मुले-मुली ठराविक कामे करण्यात व्यस्त असायची. त्या कामांपैकी एक काम म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ चोखुन, मनसोक्त आंबे खाणे. जेव्हा पाण्याची मुबलकता असे तेव्हा, विहिरींवर पोहण्यासाठी “ही” गर्दी होत असे. मी विहरीतच पोहणं शिकली. मुलीने पोहायला शिकणे, त्याकाळी रिसोडमध्ये फारच नवलाईचे होते. त्यामुळे लोकं बघायला यायचे आणि मला “एकदा विहिरीत उडी मारून दाखवना” असे म्हणत विनवणीपण करायचे. आम्ही मुले विहिरीच्या पाण्यात सलग ५/६ तास पोहत असूत. जास्तीत जास्त तास पाण्यात राहणायचा आमचा हा उच्चांक आम्हीच मोडत असूत. घरी येऊन जेवायचे, आईला कामात मदत केल्यासारखे केले की मग नंतर घरातल्या-घरात थोडी टांगळ – मंगळ करणे, बहीण भावाशी भांडणे, कॅरम, पत्ते, खडे किंवा सागरगोट्या खेळणे हे आवडीचे उद्योग. माझ्या वडिलांना रेडिओ ऐकायला फार आवडायचा, त्यामुळे ठराविक वेळी रेडिओ लागायचा आणि नकळत कानावर कधी बातम्या, कधी सवांद, बहुतेकदा गाणी ऐकायला मिळत असत. अर्थात हे सर्व “बॅकग्राऊंडला ” चालायचे आणि सोबत-सोबत कामे चालायची. तेव्हा आता सारखे, सर्व कामे सोडून लोकं टि.व्ही. समोर बसत नसत. दुपारचे ३ वाजून गेलेकी, कधी आइस्कँडीवाला, कधी उसाचा रस, तर कधी “मट्के की कुल्फी ” विकणारा दारावर यायचा. मग आठवड्यातनं एकदा ह्यापैकी एक काहीतरी विकत आणून खायला मिळायचे. माझी आई, शक्यतोवर बाहेरचे खाऊ देत नसे. त्याही काळात ती हे सर्व घरी बनवून आम्हाला भरपूर खाऊ घालत असे. संध्याकाळी, सर्वांच्या अंगणात पाणी शिंपडले जाई. उन्हे कमी झाली की, चहा घेऊन पुरुष मंडळी पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडत. मुले अंगणात खेळत, वेटाळातील बायका आपआपल्या घरासमोरील ओट्यावर बसून गप्पा मारत. माझी आई यालाही अपवादच, पण माझी आजी अधूनमधून त्या सर्वांसोबत गप्पा करीत बसत असे. मी मात्र, खेळण्यात खूप व्यस्त असायची. आजूबाजूंच्या मुलामुलींना गोळा करून कधी नदी का पहाड, कधी दोरीवरील उड्या तर कधी धप्पा-कुटी,आंधळी कोशिंबीर असे खेळ खेळणे सुरु असायचे. उन्हाळा असल्याने अंधार लगेच होत न्हवताच. खेळून दमलो आणि अंधार पडू लागला की, आम्ही मुलं कांगोळा करून आमच्या ठराविक जागी जाऊन भुताखेतांच्या गप्पा करत बसायचो. मग भीती वाटून, बरीच मुले पळ काढायची आणि काही माझ्यासारखी मागे राहिलेली एक/दोन जण उरलेल्याना त्यांच्या घरी सोडायला जायची. घरून बोलावणे आल्याशिवाय घरी परतायचे नाही, हा माझा शिरस्ता असे. घरी परतले की, हात-पाय स्वच्छ धुऊन मग शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान असेच बरेच काही म्हणणे क्रमप्राप्त होते. उन्हाळ्यात रात्रीचे जेवणं सहसा घरातील अंगणात तर कधी गच्चीवर ठरलेले. रात्रीचे झोपणेपण, आकाशातील तारांगन बघत आणि रेडिओ ऐकत, बाहेरील अंगणातच असायचे. अगदी पहाटे, थंडी वाजू लागलीकी घरात पळून जाऊन, परत गुडूप झोपण्याची मजाच काही और. ती अनुभवायलाच हवी, शब्दात सांगणे कठीण. तेव्हा कधी डास का चावत नसत, ह्याचे मला आजही राहून-राहून आश्चर्य वाटते. त्या काळात पैश्याची खूप चंगळ नसली तरी, सुखाची मात्र रेलचेल होती. आणि सुखही कसे तर निरामयी आणि चिरंतर. अशी होती ती लहानपणीची दहावी पर्यंतची उन्हाळ्याची सुटी.
दहावीनंतर, शिक्षणासाठी दूर राहणे आले. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे आयुष्यातले महत्त्व अजूनच वाढले. उन्हाळा जवळ आला की घरी जाण्याची खूप ओढ लागायची. मन घराचा रस्ता धरून, कधीचेच घरी पोहचलेले असायचे. घरी जाऊन आईवडील, आजी-आजोबांसोबत राहण्याचा आनंद मनमुराद लुटणं, ह्या सारखे सुख जगात नाही, ह्याची नव्याने जाणीव झाली. खाण्या पिण्याच्या चंगळीशिवाय, जीवनातील आपल्या माणसाचे असणे अधिक महत्वाचे आहे, हे त्याच उन्हाळ्यातील सुट्ट्यांची मला शिकवले. नंतर पुढे जाऊन शिक्षण पूर्ण होईपर्यंत ७/८ वर्षे हेच निरंतर सुरु होते. परीक्षा झाल्या की, रिसोडला जाणे आणि घरी मनसोक्त राहणे, हाच उद्योग होता. मग पुस्तके वाचत,रेडिओ ऐकत मी कधी घरातील जिन्याच्या पायऱ्यात, तर कधी गायीच्या गोठ्याजवळ, कधी कन्हेरीच्या मोठ्या झाडाखाली, तर कधी गच्चीत बसून, आठवणी तयार करत असे. आणि त्याच आठवणी मग, होस्टेलला गेल्यावर माझी सोबत करत. नंतर नौकरीवर काम करायला लागल्यानंतर उन्हाळा हा “ए.सी.” रूममध्ये बसून काम करण्यातच गेला. लस्सी, कोल्ड कॉफी, आईसक्रीम,फालुदा, मस्तानी खाण्याइतपतच उन्हाळा सीमित झाला. चोखून खणाऱ्या आंब्यांची जागा हापूसने घेतली. उन्हाळयाच्या सुटीत घरी जाणे, ही संकल्पनाच दूर दूर जाऊ लागली. मग पुढे लग्न झाले आणि २/३ वर्षांनी मी माझ्या नवऱ्यासोबत दोहा,कतारला आली. आणि परत एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीची ओढ जागृत झाली. कतारचा उन्हाळा सुरु होईपर्यंत,आपल्या महाराष्ट्रात पावसाळा सुरु होतो. पण येथील मुलांसाठी तीच “समर व्हॅकेशन”. आणि सालबादानुसार त्या सुटीत, परदेश स्थित राहणाऱ्या ,मातृभूमीला परत जाणाऱ्या, आमच्यासारख्या पालकांसाठी “ती उन्हाळ्याची सुट्टी” परत सुरु झाली. इथे येऊन आता १२ वर्षे होत आलीत. आणि गेली ११ उन्हाळे, आम्हाला भारत पर्यायानं महाराष्ट्र घरी बोलवत असतो. विमान जरी अफाट वेगाने घरी नेत असलं तरी, त्याहीपेक्षा प्रचंड वेगाने मन आधीच मातृभूमीला पोहचलेले असतं. त्याच सुट्टीच्या निमित्ताने आईवडिला, सासू सासरे, भाऊ-भावजय, नणंद, भाचे मंडळी, आप्त नातेवाईक ह्या सर्वांना भेटता येत. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं.
पण ह्यावर्षी म्हणजे २०२० सालात, उन्हाळा वेगळेच रूप पांघरून आला आहे. करोनाने जगभर घातलेल्या थैमानाने उन्हाळ्याचाच नाहीतर येणाऱ्या कितीतरी महिन्यांचा विस्कोट करून टाकलाय. कतारमध्ये उन्हाळा आला, पण ह्यावेळी भारतात जाणे दुरापास्त झाले आहे. आता अशी “ही एक उन्हाळ्याची सुट्टी” की, जी आपण सर्वच इथं कतारमध्ये राहून व्यग्रतेत व्यतीत करीत आहोत. दुःख उन्हाळ्यात कतारमध्ये राहण्याहचे नाही आहे, दुःख आहे स्वकीयांना भेटता येणार नाही ह्याचे. असो, हाही एक उन्हाळा, कधीही न विसरता येण्यासारखा.
सौ. अंजली अमोल पिंपळे
दोहा,कतार
email – anjalipimple@gmail.com
Mobile – 55005964