तर अशी फिटली हौस…
तब्बल ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तो दिवस उजाडला. थांबा, ९ महिने म्हटल्यावर भलताच विचार करू नका, मी आमच्या सुट्टीच्या प्रवासाबद्दल बोलतोय. आता तुम्ही म्हणाल की यात एवढं काय विशेष. पण जर का तुम्ही सिंगापोरमध्ये (हो, सिंगापूर नव्हे!!) वास्तव्यास असाल आणि दर ३ – ४ महिन्याकाठी तुम्ही सिंगापोर च्या जवळपास कुठेच फिरायला नाही गेलात तर तो फाऊल धरतात. तसं करावं वाटण्यामागे कारणेही बरीच आहेत, पण ती नंतर कधीतरी.
तर आम्ही रात्री ८ वा. च्या विमानाने रात्री १० वा. (स्थानिक वेळा) पर्यंत बँकॉक (थायलंड) ला पोहोचणार होतो. सकाळी मस्तपैकी एका नवीन जागी उठण्याच्या हौसेपायी दुसऱ्यादिवशी पहाटे प्रवास न करता आम्ही आदल्या दिवशीच रात्री तेथे पोहोचायचं ठरवलं होतं. त्यामुळे रात्री फक्त काही तास झोपण्यापुरतं हॉटेल एक दिवस जास्तीचं बुक करावं लागणार होतं पण ऑफिसची वेळ विमानाची वेळ आणि सुट्ट्या हे सगळं व्यवस्थित जुळूनही आलं आणि शिवाय हौसेला मोल हे नसतंच.
अरे हो!! आता पुढे घडणाऱ्या प्रसंगांच्या अपेक्षा, ‘सुजाण’ वाचकांनी ‘था’ वरून ‘म’ वर नेण्याआधीच सांगितलेलं बरं, की, ‘आम्ही’ म्हणजे ‘मी, माझी बायको आणि माझा मुलगा’. काय करणार, बँकॉक’ किंवा एकंदरीतच ‘थायलंड’ या जागेच वलयच एवढं जबरदस्त आहे की हे सगळं आधीच स्पष्ट सांगणं गरजेचं होऊन जातं. हेच मी सांगितलं असतं की ‘आम्ही इतर कुठेही चाललो होतो’, तर ‘आम्ही म्हणजे ‘कोण कोण’ ही शंका तुमच्या मनात ना डोकावली असती, ना काही जणांच्या (हो फक्त ‘जणांच्या’च) मनातील माझ्याबद्दलची ईर्षा अशी क्षणार्धात आभाळाला भिडली असती. आता या स्पष्टीकरणामुळे ‘त्या’ काही जणांना नक्कीच थोडं हायसं वाटलं असेल.
तर नेहमीप्रमाणे ऑफिस संपवून मी घरी आलो आणि आम्ही सामान घेऊन चांगी विमानतळावर पोहोचलो. विमानतळावरील सर्व सोपस्कार पार पाडून प्रस्थानद्वारापर्यंत (Departure Gate) सर्व काही अलबेलं होतं. विशेष म्हणजे विमानतळावर जाण्यासाठी घरून कधी निघायचं, (‘हिच्या’ कपड्यांमुळे) किती (जास्तीच्या!!) बॅग्स झाल्या आहेत, अमुक च्या ऐवजी तमुक टॅक्सी का नाही केली, विमानतळावर एवढे फोटो का काढायचे इ. कशावरही आमच्या दोघांमध्ये वाद देखील झाले नव्हते! खरंतर आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे हे आमच्या आतापर्यंत ध्यानात यायला हवं होतं, पण कदाचित आमचे मन आमच्या सर्व योग जुळून येऊन लवकरच पूर्ण होणाऱ्या हौसेत रमले असावे!
तर गेट पर्यंत आम्ही पोहोचलो आणि खरी मजा इथून पुढे सुरु झाली. आमचं विमान वेळेवर गेट वर लागूनही (का येऊनही, विमानाच्या बाबतीत नक्की काय म्हणावे हे आज पर्यंत मला कळालं नाहीए), बोर्डिंग अपेक्षित वेळी चालू नाही झालं. आता जस्-जसा बोर्डिंग साठी उशीर होत होता तस्-तसा माझ्या मनात आमच्या हौसेवर फिरणाऱ्या पाण्याचा साठा तयार होत होता.
शेवटी तासाभराच्या उशिराने आम्ही विमानात बसलो आणि हुश्श केले पण ते जरा लवकरच केले आहे याचा लगेचच प्रत्यय आला. कारण नेहमीप्रमाणे उड्डाणाआधीची हवाईसुंदर्यांची जी लगबग असते ती काही सुरु झालेली नव्हती. काही वेळ शांत राहिल्यानंतर सहप्रवाश्यांच्या सामूहिक वळवळ आणि च्चच्-कार यांना सुरुवात झाली होती. हवाईसुंदर्यांनी प्रवाश्यांसाठी चक्क न मागताच पाणी फिरवण्यास सुरुवात केली होती. त्यांचे वागणे नेहेमीपेक्षा काकणभर अधिकच नम्र झाले होते. आणि थोड्याच वेळात घोषणा झाली की काही तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणास थोडा अजून उशीर अपेक्षित आहे; दिलगिरी, संयम, आभारी वगैरे नेहमीचेच घासून घासून गुळगुळीत झालेले शब्द कानावर आले आणि तिने न मागता दिलेले पाणी माझ्या पोटात न जात थेट माझ्या मनातल्या त्या साठ्यात जाऊन जमा झाले. अशा परिस्थितीतही आम्ही तब्बल २ तास काढले पण तरीही तांत्रिक बिघाड दुरुस्त न होऊ शकल्याने आम्हाला विमानातून परत गेटवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. सूचनेप्रमाणे, आम्ही आमचे सामान घेऊन परत एकदा गेट वरच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो.
आतापर्यंतच्या अनेक विमानप्रवासात विमानाच्या उड्डाणास अनेक वेळेस नानाप्रकारे उशीर झाला आहे. यात कधी चेक-इन उशिरा, कधी बोर्डिंग उशिरा तर कधी ATC कडून परवानगी न मिळाल्याने प्रत्यक्ष उड्डाण उशिरा. पण विमानात बसवून परत उतरवण्याचा हा प्रकार अनुभवात तर सोडाच पण कधी ऐकिवात पण नव्हता. आज घडणाऱ्या ‘प्रथमच’ च्या यादीत ही देखील एक गोष्ट शिरली पण अजून यादी वाढणार आहे याची आमच्या मनाला जराही कल्पना नव्हती आणि माझ्या मनात ‘वाढणाऱ्या पाण्याला’ जराही उसंत नव्हती. या एवढ्या सगळ्यात एक मात्र नशीबच होते की आदल्या दिवशीच प्रवास करायची कल्पना कोणा एकाची नसून आमच्या दोघांची असल्यामुळे, आमच्या दोघांमधील ‘तू तू – मैं मैं’ ला आज तरी जागा नव्हती.
गेट वर परतल्यावर मात्र प्रवाश्यांचा संयमाचा बांध फुटला होता. तो शमवण्यासाठी विमान कंपनीने पाणी, बिस्किटे, ज्युसेस, कोल्डकॉफी इ. चे पॅकेट्स वाटण्यास सुरुवात केली. तो घेण्यासाठी प्रवाश्यांचा अक्षरशः गलका उठला. आमच्या सहप्रवाश्यात आमच्याशिवाय इतर कोणीही भारतीय मला तरी दिसला नव्हता त्यामुळे अशावेळी फक्त भारतीयच असा प्रकार करतात ही माझी समजूत पार पुसून गेल्याने माझ्या मनाला एक वेगळेच समाधान मिळाले पण एकंदरीत या सगळ्या घटना माझ्या मनातील ‘त्या’ पाण्याच्या साठ्यात भर घालणाऱ्याच ठरत होत्या.
या सगळ्या गोंधळात आणखी एक तास गेला. या दरम्यान प्रवाशांचे विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबतचे वाद – प्रतिवाद, समस्यांचे निराकरण, पर्यायी व्यवस्थेबद्दलची चर्चा हे सगळे प्रकार चालू होतेच. आणि उड्डाणास अजून जास्तीचा वेळ लागणार आहे याचा आणखी एक संकेत मिळाला. आमच्या समोर आता ट्रॉलीज् मधून सगळ्यांना वाटण्यासाठी जांभळ्या रंगाचे ब्लँकेट्स आणण्यात येत होते आणि परत एकदा ते घेण्यासाठी लोकांची तशीच झुंबड आणि माझ्या मनात परत एकदा तेच समाधान!! काही मिनिटांतच गेटचा आख्खा परिसर जांभळ्या रंगात न्हाऊन निघाला. गरज असो अथवा नसो, जवळ जवळ प्रत्येकाच्या अंगावर किमान एक ब्लॅंकेट होते. माझ्यामते लोकांच्या मनात या सर्व गोष्टींचा अशाप्रकारे उपभोग घेऊन (लूट करून), सर्व प्रवासी विमान कंपनी प्रति मनात निर्माण झालेल्या त्यांच्या भावनांना असे व्यक्त करत असावेत पण माझ्या मनातील पाण्याच्या साठ्याचे एव्हाना भल्यामोठ्या डोहात रूपांतर झाले होते!
रात्री ८ वा. उडणारे आम्ही (प्रवासी आणि विमान, असे दोन्ही पक्षकार), रात्रीचे १२ वाजून गेले तरीही तेथेच होतो. इतर सहप्रवाश्यांसोबत गप्पा मारताना एक लक्षात आलं की आमच्या सर्वांच्या मनात आता एक नवीन संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे जरी आता त्यांनी सांगितलं की तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे, आता चला; तरीही आता मात्र ‘त्या’ विमानाने जाण्यासाठी खासं धाडसच दाखवावं लागणार होतं. त्यामुळे अजून थोडा उशीर झाला तरीही या विमानाऐवजी दुसऱ्या विमानाची व्यवस्था व्हावी हे पण कुठेतरी वाटत होतं.
शेवटी माझाही संयम संपल्याने मी त्यांच्या कर्मचाऱ्याकडे प्रवासाच्या इतर पर्यायांबद्दल विचारण्यास गेलो आणि तेवढ्यात तिच्या वरिष्ठांकडून तिला संदेश आला की आता थेट उद्या सकाळी १० वा. पर्यायी विमानाची व्यवस्था केली आहे आणि त्यामुळे विमान कंपनीने प्रवाश्यांच्या (उरल्या सुरल्या) रात्रीपुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. जसे हे माझ्या कानावर आले तास माझ्या मनातील तो पाण्याचा डोह फुटला आणि आमच्या हौसेची नौका त्यात पूर्णतः बुडाली. आता कधी नव्हे ते जुळून आलेले योग असे दुरावले आणि सुट्टीचा एक दिवस वाया जाणार याचे वाईट वाटून घ्यायचे का त्या विमानाने आता प्रवास नाही करायचा आहे याचा आनंद मानायचा हे काही कळत नव्हते. योगायोगाने मी तिथेच तिच्या समोरच असल्याने, तिने हॉटेल वर जाण्यासाठी सर्वांना जमा करण्यास माझ्यापासूनच सुरुवात केली आणि योग्य वेळी, योग्य जागी असल्याचे नशीबही आयुष्यात प्रथमच खुलले. तिच्याशी बोलताना हे देखील कळालं की विमान कंपनीच्या इतिहासात देखील हे सर्व प्रथमच होत होतं. (आणि नशीब खुलले हे एवढ्याकरता, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला हे कळाले की त्या विमानकंपनीचा करार असलेली हॉटेल्स पूर्वीपासूनच जवळपास पूर्ण भरली असल्याने, फक्त काही मोजक्या लोकांचीच राहण्याची सोय होऊ शकली होती आणि आमच्या बऱ्याच सहप्रवाश्यांनी विमानतळावरच रात्र काढली होती).
आणि तासाभरातच, आमचा ठराविक संख्येचा पहिला चमू, एका दुसऱ्या कर्मचाऱ्यासोबत, परत एकदा विमानतळावरील सर्व सोपस्कार, आलो त्याच्या उलट्या क्रमाने पूर्ण करीत, त्यांनीच व्यवस्था केलेल्या एका प्रशस्त गाडीतून प्रवास करून, एका जवळच्याच आलिशान हॉटेलवर पोहोचलो देखील! आमच्याच गाडीत आमच्या त्या न उडालेल्या विमानाचे दोन्ही वैमानिक आणि हवाईसुंदऱ्यादेखील होत्या. त्यांनीही आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. माझ्या मुलाला तर, विमान हा मुळातच आवडीचा विषय असल्याने, वैमानिकासोबत, एवढ्या सहज, प्रथमच गप्पा मारता येत असल्याचा वेगळाच आनंद होत होता.
हॉटेलवर जात असताना मनात अनेक विचार आले, जसे कुठेही प्रवास न करता प्रथमच आम्ही एकाच देशाचे इमिग्रेशन दोन वेळेस क्रॉस केलं, अवघ्या ३०-३५ मिनिटांवर घर असताना आम्ही प्रथमच एका हॉटेलमध्ये राहणार होतो आणि आमची हौस अशाप्रकारे विविध गमतीदार अनुभव घेऊन, नवीन देशात नाही तरीही किमान नवीन जागी दिवस सुरु करून अखेर पूर्ण होणार होती.
प्रसाद कुलकर्णी