“प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई” ह्या गीताची सुरुवातीची ओळचं आई बद्दल खूप काही सांगून जाते. त्यातच आईची माया, ममता या सर्व भावना ओसंडून वहात असतात. आयुष्यात स्त्री ही माता, मुलगी, सून अशी अनेक नाती निभावत असते. पण त्यात सगळ्यात पहिल्या नात्याचा सन्मान मिळतो ते हे आईचे नाते असते. मातृत्व हे एक अनोखे बंधन आहे. मग ते सजीवांच्या मध्ये कोणाचेही असो. भूतलावरचे सर्व सजीव प्राणी, पक्षी यांच्यातही आईची माया ही मुक्या भावनेने खूप काही बोलून जाते.
जेव्हा लग्न झालेल्या एखाद्या स्त्रीला मातृत्वाची गोड चाहूल लागते. तेव्हा तिला होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. असा हा सुखद क्षण प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात येतोच. मूल जन्माला येते तेव्हा पहिला चेहरा आईचा बघते. म्हणून म्हणतात ना, की आई आणि मुलाची नाळच अशी जोडलेली असते की ती ते नाते अखंडपणे पार पाडत असते.
आई आपल्या आयुष्यात आपल्या संगोपनाबरोबरच मार्गदर्शक आणि शिक्षकाची भूमिका निभावते. आपल्या आयुष्यात जे काही आरंभिक ज्ञान आणि शिकवण आपल्याला मिळते ते फक्त आपल्या आईने दिले आहे. यामुळेच आईला प्रथम गुरू म्हणून देखील ओळखले जाते.
परिपूर्ण जीवनासाठी आईची शिकवण, आपल्या आईने आपल्याला दिलेल्या शिकवणींना आपल्या आदर्श जीवनाच्या निर्मितीत खूप महत्त्व आहे कारण लहानपणापासूनच आई आपल्या मुलास धार्मिकता, सद्गुण आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे यासारखी महत्त्वाची शिकवण, संस्कार देत असते. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवनात आपला एखादा मार्ग गमावतो तेव्हा आपली आई नेहमी आपल्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. आपल्या मुलांनी चुकीच्या कृत्यात गुंतावे अशी कोणतीही आई कधीच इच्छा करत नाही. आपल्या सुरुवातीच्या जीवनात, आपल्या आईने असे अनेक महत्त्वपूर्ण संस्कार केले आहेत, जे आपल्या आयुष्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणूनच आदर्श आयुष्य घडविण्यात आईचा मोठा हातभार मानला जातो.
मी हे मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने म्हणू शकते. की माझी आई या जगातील सर्वात चांगली गुरू आहे कारण तिने मला माझ्या सुरुवातीच्या जीवनात सर्वकाही शिकवले तसेच मला जन्म दिला, ज्यासाठी मी तिची ऋणी आहे. मी लहान असताना आईने मला बोट धरून चालणे शिकविले. जेव्हा मी थोडी मोठी होत गेले तेव्हा आईने मला सर्व प्राथमिक गोष्टींचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. मी जेव्हा जेव्हा कोणत्याही कामात अयशस्वी झाले तेव्हा माझ्या आईने माझ्यावरचा विश्वास अधिक वाढवला. जेव्हा जेव्हा एखादी समस्या समोर दिसायची तेव्हा माझ्या आईने त्या अडथळ्यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिच्या आयुष्यातील अनुभवावरून मिळविलेले ज्ञान एखाद्या उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या युक्तिवादापेक्षा कमी नाही. आजही ती या जगात नसली तरी तिने दिलेल्या शिकवणीमुळे मी आज सक्षम आहे कारण मी कितीही मोठी असले तरी आयुष्याच्या अनुभवात मी नेहमीच तिच्यापेक्षा लहान असेन. खरं तर माझी आई माझी सर्वोत्कृष्ट गुरू होती आणि तिची प्रत्येक शिकवण अनमोल आहे.
तिने मला फक्त प्राथमिक ज्ञान दिले नाही तर मला जीवन जगण्याची जीवनशैली देखील दिली आहे. समाजात कसे वागावे हे शिकवले आहे. ती माझ्या सुख, दु:खामध्ये माझ्याबरोबर होती, माझ्या सामर्थ्याने माझी ती एक शक्ती आहे आणि ती माझ्या प्रत्येक यशाची कोनशिला आहे.
तात्पर्य असे की, आपल्या आयुष्यात आपण कितीही शिकलो तरी आपल्या आईकडून आपण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्या गोष्टी इतर कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही. हेच कारण आहे की एकवेळ आपण कधीही पट्कन देवाचे नाव घेणार नाही पण आपल्याला काही झाले की, “आई ग” अशी हाक मारतो. म्हणून मुल बोलायला लागले की, “आई” म्हणून जेव्हा हाक मारते तेव्हा होणारा आनंद खूप काही सांगून जातो. “आई” या नात्याची तुलना जगात कोणीच कशाशी करू शकत नाही. मला आयुष्य जगण्यास शिकविले ती माझी आईच… ज्यांच्या जवळ आई आहे ती व्यक्ती सर्वाधिक भाग्यवान आहे. आणि ज्यांच्या जवळ आई नाही किंवा आईचे सुख नाही. त्यांच्या तोंडी नकळतपणे एकच वाक्य येते “आई कुणा म्हणू मी” आणि त्याचक्षणी ते नेत्रही अलगदपणे साठवलेल्या आसवांना वाट मोकळी करून देतात.
अशी ही आई प्रत्येकाला प्रिय असते. “प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू मी तुज आता कोणत्या उपायी” हे माधव जुलिअन यांचे शब्द मर्माला भिडून जातात.
खरंतर “मातृदिन” हा रोजच असतो. आईच्या आठवणीं शिवाय कोणताच दिवस जात नाही. आई हे दैवत प्रत्येकाच्या घरात उभे असते, आयुष्यभरासाठी ‘आशीर्वाद’ देण्यास. अशाच समाजातील प्रत्येक मातेला त्रिवार सलाम !!
© मुग्धा मनोज पानवलकर.