“चलो बुलावा आया है, माताने बुलाया है” हे गाणे लहानपणी ऐकले की खूप हसू यायेचे, माता अशी बोलवते का?
माझे बालपण भोपाल आणि जयपूर मध्ये गेले. शेजारी उत्तर भारतीय होते. आपला जसा गणपती तशी त्यांची माता रानी! त्यामुळे नवरात्र,जागरण, माता की चौकी हे प्रकार खूप अनुभवले. वैष्णो देवीची यात्रा करणारे दर दोन एक महिन्यांनी कोणी ना कोणी भेटायचचं. योग आल्याशिवाय यात्रा होत नाही, असा त्यांचा समाज आहे.
माझी आई खूप श्रद्धाळू,अर्थात सगळ्या आयांसारखी! तिची खूप इच्छा होती यात्रा चालत करायची, पण तसा योग तेव्हा आला नाही. नंतर आम्ही मुंबईला परत आलो. कधी विषय निघाला की बाबा चिडवायचे “माताचा बुलावा नाही आला अजून”!
2010 साली जम्मू कश्मीर टुर ठरवताना आईला “माता का बुलावा “आला. मी आणि बाबा नोकरी करत होतो. आमच्या दोघांच्या सुट्या बघून जी टुर ठरली त्यात वैष्णो देवी यात्रा होती. तिची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हं दिसू लागली. आता काळजी होती तिला यात्रा झेपण्याची कारण दरम्यानच्या काळात आईने दोनदा कर्करोगावर मात केली होती. तिची प्रकृती पाहिल्यासारखी नव्हती. खूप श्रम सोसायचे नाही, चढून जाणे तिला जमेल का याची आम्हाला शाश्वती नव्हती.
कटराहून वैष्णो देवीची यात्रा सुरू होते. कटरा आणि वैष्णो देवी “भवन”(माताची पवित्र गुफा) मधले अंतर 13 कि.मी. आहे. पण आपण समुद्रापासून 2500 फुटांवरुन 5200 फुटांवर जातो. अंतर जरी खूप नसले तर ऊंची या यात्रेतील महत्वाचा घटक होता. आपण रोज काही इतक्या उंचावर चढत जात नाही.आम्ही कधीच ट्रेकिंग केले नव्हते. आता पर्यन्त आईचे आजारपण, कॉलेज बरोबर सीए चा अभ्यास, आर्टिकलशिप आणि मग नौकरी या सर्व मध्ये मी ही कधी खूप धाडसी असे काही केले नव्हते. ही यात्रा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरणार असे दिसत होते.
मे मध्ये टुर सुरू झाली. गुलमर्गला आमच्या लक्षात आलं, उंचीवर आईला त्रास होतोय आणि घोड्यावर बसणं तिला शक्य नाहीये. आम्ही कटराला पोहचलो. यात्रेसाठी ग्रुप मधील बरेच जण घोडा करणार होते. वयस्कर मंडळींनी पालखी ठरवली होती. आई काही पालखी साठी तयार होईना. ”मी चालणार, माझी देवी मला साथ देईल” हे तिचं म्हणणं चालूच होतं. आईची इच्छाशक्ती जबरदस्त आहे, आणि देवावरचा विश्वासही, पण हे पुरेसे आहे का हे आम्हाला कळत नव्हते. मी या यात्रेकडे एक आव्हान म्हणून बघत होते, माझी मानसिक आणि शारीरिक क्षमता तपासायला.
आम्हाला टुर गाइडने सूचना दिल्या. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून, रात्री यात्रा सुरू करायची आणि सकाळ पर्यन्त खाली यायचे. त्यांचापैकी एक जण आधीच वर जाईल, तो दर्शनाची व्यवस्था बघेल. एक जण घोडा, पालखी या साठी मदत करेल. दर्शन झाल्यावर हॉटेल वर परत जा.
आम्ही सर्व रात्री साडे दहाला “दर्शनी दरवाजाला” पोहोचलो, इथून यात्रा सुरू होते. चेक पोस्टला चेकिंग झालं. आम्ही चर्चा करून असा ठरवलं होते की आई बाबा एकत्र चालतील. मी आमच्या बरोबर देशपांडे काका होते त्यांचा बरोबर जावे. समजा आईला नाही झेपले तर आई बाबा परत जातील. मी त्यांचा बरोबर राहिले आणि बाकी सगळे पुढे गेलेले असले तर मला सोबत नसेल. काकांबरोबर माझी यात्रा पूर्ण होईल आणि मी आईची इच्छा पूर्ण करेन. खूप फिल्मी वाटला ना “माँ की इच्छा” वगैरे!
महत्वाचे राहिला की, आमच्याकडे फोन नव्हते. आम्ही थोडे पैसे घेऊन निघालो होतो. पवित्र गुहेत फोन कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत, लॉकर सुविधा आहे. पण नंतर तिथे त्यासाठी लाइन टाळण्यासाठी आम्ही हातात काहीच ठेवले नव्हते. त्यामुळे आई बाबांशी संपर्क थोडा कठीण होता. तर अशा आमची यात्रा सुरू झाली, वेग वेगळी!
चेक पोस्ट गेल्यावर, एका पुलाखालून बाणगंगा वाहताना दिसली. वर्षभर या नदीला पाणी असते.भाविक पुढे जाण्यागोदर येथे स्नान करतात. असं म्हणतात की माता वैष्णोदेवी जेव्हा पवित्र गुहेकडे जात होती, तेव्हा तिने बाण मारून या नदीचा उगम केला होता. हा पहिला टप्पा होता. काका आणि मी गप्पा मारत चालत होतो. हवेत गारवा होता खूप थंडी नव्हती. वर जाणारा संपूर्ण रस्ता दिव्यांनी उजळलेला होता. चंद्रप्रकाश ही छान पडला होता. रात्री यात्रा सुरू करणारे आमच्यासारखे बरेच होते. आम्ही तर काही ओझं नको म्हणून हात हलवत आलेलो, पण बॅगा घेऊन जाणारे खूप भाविक होते. लहान मुले सुद्धा “जय माता दी“ करत पायी चालत होती.
साधारण दीड कि.मी. नंतर आम्ही दुसर्या टप्प्यावर पोहोचलो. चरण पादुका 3380 फुट उंचीवर आहे. येथे माताच्या पावलांचे ठसे आहेत. आम्ही लांबून नमस्कार करून निघालो. आता पर्यन्त आमच्याबरोबर चालणारी बाकी ग्रुपची लोकं मागे पडली होती. आई बाबा हळूच चालणार होते. एरवी दोघे कुठे चालत गेले तर आई मागे आणि बाबा खूप पुढे गेलेले असायचे. आई बाबा आज परत सप्तपदी करणार होते.
आम्ही चालत होतो आणि “सारे बोलो जय माता दी, जोरसे बोलो जय माता दी“ हा जयघोष सतत ऊर्जा देत होता. चरण पादुकाहून अद्धकुमारीला पोहोचलो,तेव्हा आम्ही 4800 फुटांवर होतो. इथे आपण यात्रेचा अर्धा पल्ला गाठतो, कारण इथून कटरा आणि भवन दोन्ही समान अंतरावर आहेत. असं म्हणतात की या तिसर्या टप्प्यावर देवीने 9 महीने राहून तपस्या केली होती. ज्या गुहेत ती बसली होती ती गर्भाच्या आकाराची आहे.
आम्ही तिथे जरा वेळ विसावलो, तर लगेच एक जण पायाशी आला. मी घाबरून उभीच राहिले. तेव्हा लक्ष गेले, रस्त्यावर मालीश करून देणारे होते. जर कोणी बसलं तर लगेच येऊन पायांची मालीश करायला लागायचे, अर्थात हा त्यांचा व्यवसाय होता. मालीश करता करता ते तुम्हाला दिलासा पण द्यायचे “थोडेच अंतर आहे, काळजी करू नका , पोचाल तुम्ही!” त्यामुळे मला वाटू लागल होत की आई नक्की यात्रा पूर्ण करेल. तिथले वातावरणच इतके प्रेरणादायी होते.
आम्ही हिमकोटीला पोहोचलो. इथून दिसणारा परिसर खूप विलोभनीय आहे. सकाळी हे दृश्य अजून मोहक असेल हे जाणवले. कॅमेरा नसल्यामुळे इथून दिसणारा परिसर डोळ्यात साठवून घेतला. आजही डोळे बंद केले की ते दृश्य दिसते.
पुढे चढ चढत, आम्ही 6200 फुटांवर संजीछतला पोहोचलो. चालत इतक्या उंचावर मी पहिल्यांदाच पोचले होते. खूप दमछाक झाली, पण काका होते प्रोत्साहानला! त्यानंतर उतार होता,कारण भवन आहे 5200 फुटांवर! हा उतार खूप आरामदायक होता शरीराला. साधारण एक वाजता आम्ही भवनला पोहोचलो. आम्ही पवित्र गुहेत जाऊन दर्शन घेतले. इथे कुठला फोटो, मूर्ति नाहीये तर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पिंडीच आहेत. खूप प्रसन्न वाटत होते, क्षीण पाळला होता. शारीरिक आणि मानसिक दोन्ही परिक्षेत मी पास झाले होते. आम्ही दोघे वर पोहचणारे आमच्या ग्रुप मधले पहिले होतो ते ही चालत. आपण घोडे, पालखीवाल्यांना पण मागे टाकले याचा आनंद झाला.
आता आई बाबांची काही बातमी कळते का हे बघायचे होते. मेन गेटला मी बसून राहिले माणसं बघत! येणार्या प्रत्येकाचा चेहरा आनंदी असायचा, भवनाच्या दर्शनाने त्यांचा क्षीण निघून जायचा. हळू हळू आमच्या ग्रुप मधील सगळे येत होते. अद्धकुमारीच्या पुढे आई पोचली होती हे कळले. काकांनी परतीचा प्रवास सुरू केला, मी तिथेच थांबले.
मी डुलकी काढत बसले होते. साधारण 4.30 ला मला बाबा दिसले. सहा तास चालून आई वर पोचली होती. मी आईला आनंदाने मिठीच मारली, जणू काही आम्ही बर्याच वर्षानी भेटतोय. मला त्याक्षणी काय वाटत होते ते शब्दात मांडणे शक्य नाही. माझे हात आपोआप जोडले गेले, इच्छाशक्ती आणि देवीवरचा विश्वास जिंकले होते.
दर्शन घेऊन आई आली. तिच्या पायात खूपदा गोळे आले होते, दोन तीनदा मालीश केली होती. तिला आजूबाजूच्या वातावरणाने दरवेळी स्फूर्ति दिली होती. मला बाबांचा पण अभिमान वाटला की त्यांनी तिला छान साथ दिली. स्वतः थकलेले असताना तिला सांभाळणे सोपे नव्हते. आता परतीच्या प्रवासासाठी आई नको म्हणत असताना तिला आम्ही पालखीत बसवले. आई बाबा मार्गाला लागले.
मी टुर गाइड बरोबर त्यांचा शॉर्टकटने खाली उतरायला लागले, कमी वेळात जाऊ म्हणून! शॉर्टकट जास्त कठीण होता, कारण सगळीकडे पायर्या! आम्ही सहा वाजता उतरायला सुरुवात केली तेव्हा चांगले उजाडले होते.मंत्रमुग्ध करणारे निसर्ग सौन्दर्य बघत आणि गप्पा मारत आम्ही खाली उतरत होतो. दर सीजनला हे टुर गाइड किमान दहा वेळा यात्रा करतात आणि दर वेळी त्याच उत्साहात, याच खूप कौतुक वाटले. हॉटेलला पोचल्यावर आम्ही सगळे किमान आठ नऊ तास झोपलो हे वेगळे सांगायला नको.
ही यात्रा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. प्रत्येकाने हा अनुभव एकदा घ्यावा. यात्रा परत करायची इच्छा आहे, बघूया “माताचा बुलावा” कधी येतो.