तुमच्या पैकी बर्याच जणांना मंगळवार, 26 जुलै 2005 हया दिवशी मुंबई नगरीत पावसाने घातलेले थैमान माहित असेलच. सगळी कडे पाणीच पाणी, जणू काही महाप्रलयच होता तो. आजही सारे काही आठवले की अंगावर शहारा येतो.
माझे नुकतेच लग्न झाले होते आता मी प्रभादेवी सोडून बोरिवलीची रहिवासी झाले होते. घरात सासू, सासरे सुहास आणि मी. नेहमी प्रमाणे सकाळी आम्ही तिघेही ८ वाजता एकत्रच बाहेर पडलो. पावसामुळे ट्रेन लेट होत्या, तरीही रोज ची ८.२४ ची लोकल आज कशीबशी मिळाली. खूप धक्का बुक्की करून आत शिरले. बसण्यासाठी जागा मिळाली नाहीच त्यात पावसाची रिपरिप सुरु होती. सुहास लोअर परेल ला, सासरे मुंबई सेंट्रल ला आणि मी ग्रंटरोड ला उतरून आँफिस गाठले. पूर्णपणे भिजल्यामुळे एअरकंडिशन मध्ये शिरल्यावर काय झाले असेल ते न सांगितलेले बरे. एकदा आत पाऊल टाकले की बाहेर च्या जगाशी तसा संर्पक फारच कमी, सर्व कामे सुरळीत सुरु झाली. लोकांची हजेरी कमीच होती त्यामुळे जिथे कमी तिथे आम्ही असे करत सगळे काम सावरण्याचा प्रयत्न सुरु होता.
लंचब्रेक पर्यंत अंदाज आला की आता लोकल ट्रेन्स धीम्या गतीने सुरू होत्या. साडेतीनच्या सुमारास सगळ्यांना घरून फोन येऊ लागले की पाऊस खूप आहे जमलं तर लवकर निघा पण साहेबांना विचारणार कोण? कोणीही विचारायला धजेना शेवटी मीच पुढाकार घेऊन सरांना म्हटलं मला बोरवली गाठायची आहे तर प्लीज मी लवकर निघू का? समोरुन उत्तर आले नाही. पण थोड्याच वेळात HR Dept. कडून पत्रक आले की ज्यांनाा घरी जायचं आहे त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर निघावे.
माझ्यासोबत काम करणारे ४-५ सहकारी आम्ही सगळे निघालो. कसं बस स्टेशन गाठलं. सगळी कडे चिखल आणि पाणीच पाणी. आता लक्षात आलं की बऱ्याच ट्रेन्स एकामागोमाग एक उभ्या आहेत. बोरवली गाठणे कठीणच होते. लगेच माझ्या मनाने माहेरी जाण्यासाठी उसळी घेतली, सुहासला फोन करुन प्रभादेवीला जाण्याची परवानगी घेतली. सासुबाईना कळवले. मनोमनी पावसाचे आभार मानले.
माझ्यासोबत जे सहकारी होते त्यांच्या पैकी दोघे भांडुप व सांताक्रुज ला राहणारे होते मुख्य म्हणजे न चुकता दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात जात असत. त्याही दिवशी ते दोघे जाण्यासाठी निघाले मी त्यांना म्हटलं आज तरी घरी जा परिस्थिती बिकट दिसते पण पठ्ठठे ऐकतील तर कसले. बाकीचे ट्रेन्ससाठी थांबले आणि आम्ही बस स्टॉप वर पोहोचलो.
खूप वेळ वाट पाहूनही बस काही येईना. सव्वा पाच वाजून गेले होते. पावसामुळे अंधार झाला होता आम्ही ठरवले पायी चालू व जिथून मिळेल तिथून पुढे वाहनाने पोहोचू. सोसाट्याचा वारा, पाऊस, विजांचा कडकडाटात आमच्या छत्र्यांना आता वाऱ्याचा वेग सोसवेना त्यांनी माना टाकल्या. आम्हाला सुद्धा उमगले की छत्री शिवाय चालणेच सोयीस्कर आहे.
थोड्या अंतरावर गेल्या वर एक गोष्ट लक्षात आले की आमच्या सारखे बरेच जण आहेत जे आपले घर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. वाटेत बर्याच जणीशी ओळखी झाल्या. ज्यांची चिमुकली घरात एकटीच होती. त्यांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सगळ्या हिरकणी च्या आवेशात, चिंब भिजलेल्या आणि एकच ध्यास चिमुकल्यांची भेट.
सात वाजून गेले होते आम्ही कसेबसे हाजीअली पर्यंत पोहोचलो. आई व घरचे सारे अस्वस्थ होऊ लागले होते. सलग दोन तास पावसाचा, वाऱ्याचा मार सहन करून कुठेतरी सारखे वाटत होते की एक कटिंग चहा मिळावी सोबत भजी मिळाली तर सोने पर सुहागा. पण सगळी मुंबईच पाण्याखाली होती. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे वाहनात बसून प्रवास करण्याचा बेत एव्हाना आम्ही खणून काढला होता. वाऱ्याचा वेग अजूनच वाढला होता त्यातच भर म्हणजे माझ्या एका चप्पलेन मला रामराम करून क्षणार्धात जलसमाधी घेतली मग काय दुसरीला मी तिथेच सोडून पुढचा प्रवास अनवाणी सुरु ठेवला.
कुठे गटार, नाला किंवा खड्डे आहेत काहीच कळत नव्हतं सगळीकडे अंधार व पाणीच पाणी. मानवी साखळी करून अंधारात आम्ही एकमेकांचा हात धरून चाचपडत होतो.रस्ता संपतच नव्हता, भुक लागली होती. फोन लागत नव्हते आणि फोनची बॅटरी संपली होती. अनवाणी चालल्याने पावलेही जड झालेली होती. दूरवर वरळी दिसू लागली, हायसे वाटले की चला प्रभादेवी काही फार दूर नाही. स्वतःला समजावत पुढे पाऊल टाकले.
आठ वाजून गेले होते आम्ही एकमेकांना धीर देत पुढे पुढे चालत होतो. सततच्या पावसामुळे पाण्याची उंची वाढतच होती गुडघ्यापर्यत चे पाणी आता आमच्या कमरेपर्यंत पोहोचले होते. सिद्धिविनायकाचा धावा करत कशीतरी आम्ही वरळी ओलांडली.
मजल दर मजल करत आम्ही एकमेकांना आपुलकीने मदत करत होतो. त्या दिवशी खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते हे कळले. प्रत्येकजण दुसऱ्यासाठी झटत होता दुसऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होता. त्या दिवशी मुंबईकरांबद्दल इतका अभिमान वाटला ते शब्दात सांगण्याच्या पलीकडचे आहे.
साधारण ९.१५ च्या दरम्यान मी घरी पोचले व सुटकेचा निश्वास सोडला. माझे सहकारी सिदि्धविनायक मंदिरात पोचले आणि दर्शन घेऊन त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. घरातील बाकी मंडळी नी आपआपल्या आँफिस मध्येच थांबणे पसंत केले.
आज १४ वर्षे उलटून ही प्रयेक क्षण डोळ्यासमोरून जात नाही.
सौ. अजया सुहास रोगिये, दोहा, कतार
सुंदर