तुम पुकार लो – महेश बिळगीकर

ट्रिंग ट्रिंग ….ट्रिंग ट्रिंग… मोबाईल वाजत होता …..बराच वेळ झाला  पण कोणीच उचलला नाही तसा ठेऊन दिला    असावा …परत दोन मिनिटाने फोन वाजला  ट्रिंग ट्रिंग ….ट्रिंग ट्रिंग शेवटी प्राजक्ताने बाबांना हाक मारली “बाबा तुमचा फोन वाजतोय …घ्या ना … कदाचित हॉस्पिटलमधून फोन असेल “
त्यांनी फोन घेतला ,  फोन हॉस्पिटलमधूनच होता, त्यांनी दोन मिनिटे फोन घेतला  दुसरीकडून कोणीतरी बोलले….आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली . त्यांच्या हातून फोन निसटून खाली  पडला आणि ते घेरी येऊन कोचावर पडले.

डॉक्टर अश्विनी राणे आज खूप खुशीत होती, तिच्या मोबाईलमधला त्यांचा रोमँटिक फोटो ती बघत होती …. आशुतोषने रजा घेतली होती आणि  ते दोघे आता पुढचे १५ दिवस मस्त एंजॉय करणार होते. लग्न झाल्यापासून दोघांना वेळच मिळाला नव्हता, दोघांच्या जॉबमुळे हनीमूनलापण जायला जमले नव्हते.  आशुतोषला प्रमोशन मिळालं होतं  आणि बदलीपण. नवीन ठिकाणी जॉईन करायच्या आधी दोघांनी १५ -२० दिवस मजा करायची ठरवली होती. आशुतोषचा आणि तिचा संसार खऱ्या अर्थाने सुरु होत होता. फोटोकडे बघताना तिच्या डोळ्यासमोरून गेल्या वर्षभरातील काळ डोळ्यासमोर आला.

पदवी हातात घेऊन अश्विनीने स्टेजवरून खाली उतरली. आई बाबा आले होते , आज तिने बाबांचे स्वप्न पूर्ण केले होते. ती आज फक्त अश्विनी नव्हती तर डॉक्टर अश्विनी राजाराम वेंगसरकर  होती. आई आणि बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अश्विनीतर खूष होतीच, पण त्याला अजून एक कारण होते. पदवी घेताना स्टेजवरून तिने हॉलमध्ये नजर टाकली. तिची नजर कोणालातरी शोधत होती, उजव्या बाजूच्या  कोपऱ्यात बसलेल्या त्याला तिने नजरेने टिपले आणि तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. आशुतोष आला होता . गेल्या आठवड्यात फोनवर त्याने  मी येणार नाही माझा जॉब साधा नाही मला सुट्टी मिळणार नाही असे रडगाणे गायल्यामुळे खरे तर अश्विनी त्याच्यावर खूप चिडली होती. त्यादिवशी फोनवर हुंदकेसुद्धा ऐकू आले होते. शेवटपर्यंत मी येऊ शकत नाही असाच घोषा त्याने लावला होता त्यामुळे तिचा मूडच गेला होता, पण तिचे मन मात्र तो येईल असे तिला सांगत होतं. तो आला …कोपऱ्यात उभे राहून उंचापुरा तगडा आशुतोष  तिच्याकडे बघून हसत होता. कार्यक्रमानंतर आई बाबांना मित्र मैत्रिणींबरोबर मजा करायची असे सांगून ती सटकली. त्या संध्याकाळी त्या दोघांना पुरेपूर कल्पना आली की आता  दोघांना एकमेकांवाचून एक दिवसही काढणं  कठीण होतं. दोघे अनुरूप होतेच आणि एकमेकांच्या आकंठ प्रेमात होतं  तेव्हा दोन्ही घरच्यांनी लगेचच होकार दिला,  चट  मंगनी   पट ब्याह ची कथा होती. लग्न झाल्यावर त्यांना खूप वेळ एकमेकांबरोबर मिळाला नव्हता, आशुकडे खूप दिवस नव्हते आणि तिलापण नवीन जॉब असल्याने सुट्टी नव्हती.  शक्यतितक्या लवकर मोठी सुट्टी घेऊन येईन असे सांगून आशुतोष दिल्लीला गेला.

“आशु … ए आशु माझा   फोन वाजतोय …प्लिज  जरा घेतोस का …. मी स्वैपाकघरात आहे.. “अश्विनीने आतून ओरडून सांगितले. आशुतोषने  आतमधूनच उत्तर दिले “अगं विनी ..मी दाढी करतोय ,तूच  जरा बघ ना , आणि हे काय , तू अजून स्वैपाकघरातच ? …. मॅटीनीचा आणि  शॉपिंगचा बेत होता ना… ११ तर इथेच वाजले..”
“बरं बरं बघते , अरे तुझ्या आवडीचा गुळातला शिरा करत होते   आणि पोह्याचे पापडपण तळलेत”
अश्विनीने गॅस कमी केला आणि बाहेर जाऊन फोन घेतला. बराच वेळ ती फोनवर बोलत असल्याचे आशुतोषला जाणवले पण नंतर बराच वेळ शांतता होती. “काय ग कोणाचा फोन , आई बाबांचा का ? ” बराच वेळ अश्विनीने काही उत्तरच दिले नाही म्हणून आशुतोषने परत विचारले पण तरी उत्तर आले नाही . आशुतोष बाथरूममध्ये आरश्यासमोर दाढी करत होता , तेव्हढ्यात त्याला अश्विनीने पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि हुंदके देऊन ती रडायला लागली. “अगं काय झालं विनी ? कुणाचा फोन होता ? आई बाबांचा का? त्यांची  तब्बेत ठीक आहे ना?  का त्यांची आठवण येत्येय ? ” त्याने विचारायचा प्रयत्न केला पण तिने मानेनेच नाही सांगितले आणि ती त्याला अजूनच बिलगली, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. तिला असे बघू आशुतोषही बावरला. त्याने तिला तसेच जवळ घेतले आणि तिला बसती करून थोडे पाणी प्यायला दिले तशी ती थोडी शांत झाली. ” विनी आता सांग बघू काय झालंय?”त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवून विचारले. तिने त्याच्याकडे बघितले , तिचे टपोरे डोळे परत पाण्याने भरले. “मुंबईहून हॉस्पिटलमधून फोन होता, नवीन साथ आली आहे “कोरोना” त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट ने सगळ्या डॉक्टरना १ महिना कंपलसरी ड्युटी लावली आहे. मी त्यांना सांगितले की मी बाहेर गावी आहे आणि येऊ शकत नाही पण त्यांनी सांगितले  कंपलसरी आहे ,उद्या रात्रीपासून  माझी ड्युटी घाटकोपर राजावाडी हॉस्पिटलला आहे. मी नोकरी सोडायला तयार आहे पण त्यांनी सांगितले आपण गेलो नाही तर  स्टेट गव्हर्नमेंट आपले लायसन्स रद्द करतील.   हे आपल्या बरोबरच का होतं ? आपल्या  मी किती स्वप्न रंगवली होती आपल्या सुट्टीची ?”   अश्विनीने त्याला मिठी मारली आणि परत   रडायला लागली, आशुतोष बराच वेळ तिच्या पाठीवरून हाथ फिरवत होता. थोड्यावेळानी तो शांत झाली ,तसे आशुतोषने तिला समजावले “विनी , मी पण खूप काही प्लॅन करून ठेवलं होतं , मलापण  खूप वाईट वाटतंय.  पण तू एक विचार कर , काही दिवसापूर्वीच तू  आपल्या व्यवसायाशी आणि कर्तव्याशी प्रतिबद्ध राहशील अशी डॉक्टरकीची शपथ घेतलीस.

आज ती शपथ पूर्ण करायची संधी तुला आली आहे.  माझ्या मते तू   व्यवसायासाठी , त्या शपथेसाठी आणि देशसेवेसाठी तू गेलं पाहिजेस.  आपण जितक्या लवकर जमेल तसे  पुढची सुट्टी मॉरिशसला जाऊया… चालेल ना …?” तिने त्याला अजूनच घट्ट मिठी मारली आणि मानेनेच संमती दर्शवली. उशीरा काही इलाज नव्हता , त्यांनी लगेचच रात्रीच्या विमानाचे तिकीट काढले. आणि अश्विनी दुसऱ्यादिवशी रात्री जॉईन झाली. तिकडे आशुतोषने आपली रजा रद्द केली आणि  तोही जॉईन झाला, म्हणजे नंतर ती आल्यावर  सुट्टी मागता येईल. त्यालाही लगेचच वरच्या जागेच्या  महत्वाच्या कामानिमित्त बाहेर जायला लागले.   पुढचे दहा दिवस अश्विनीने स्वतःला कामात झोकून दिले होतं, तिला बारा तासांची ड्युटी होती आणि ८० -१०० रुग्ण बघायला   लागत होते, खाण्यापिण्याची सुद्द्धा नसायची घरी येईपर्यंत  थकून जायची. आशुतोषशीही बोलणे व्हायचे नाही पण त्याला त्याची कल्पना होती.  अकराव्या दिवशी ज्याची भीती होती तेच झाले, अश्विनीची टेस्ट पॉझिटिव्ह आली. अश्विनीला आत्मविश्वास होता कि ती लगेचच बरी होईल म्हणून उगाचच आशुतोषला कळवू नका म्हणून तिने हट्ट धरला. बरी झाली की ती त्याला स्वतःच फोन करून सांगणार होती. ती स्वतः डॉक्टर होती तेव्हा सगळ्यांना ते तिने पटवून दिले.  पण काल सकाळपर्यंत चांगली असलेली अश्विनी दुपारी  एकदम सिरीयस झाली. रात्रीचे रिपोर्ट खूपच खराब आले , कोणाला तिथे भेटायला जाणेही शक्य नव्हते . सगळ्यांना असे अचानक होण्याचे कारण कळत होतं, काल सकाळी ती बातमी मिळाल्यापासून  घरात सगळे सुन्न बसून होते. आणि आता काही मिनिटांपूर्वी हॉस्पिटलमधून फोन आला

“अश्विनी  इज नो मोअर ………”
काल सकाळी आलेल्या  फोनवरचा निरोप  बाबांच्या कानात घुमत होता.
” हॅलो , मेजर आशुतोष राणे के पिता बोल रहे है ? ब्रिगेडिअर  रॉयचौधरी कॉलिंग फ्रॉम २१ राष्ट्रीय रायफल हेडक्वार्टर. आज पुरे भारत देशको मेजर आशुतोष राणेंपर गर्व है. कल रात हंदवारामे आतंकवाडियोकें साथ लढते मेजर राणे शहीद हो गये. ……”
घरच्यांनी ही  बातमी अश्विनीला सांगितली नव्हती पण तिथे असलेल्या टीव्ही मुळे तिच्यापर्यंत लगेचच पोहोचली होती.   आशुतोषनी मागे त्याच्या आवडीचे गाणे अश्विनीला सांगितले होतं “तुम पुकार लो … तुम्हारा इंतजार है …” आणि आशुतोषच्या हाकेला अश्विनीने साथ दिली होती.

महेश इंदुमती वसंत बिळगीकर
ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे  सुरक्षित आहेत, कथेचे पूर्ण अथवा अंशतः पुनर्मुद्रण अथवा वापरासाठी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top