झपाझप पाय उचलत निघालो होतो, आभाळ भरून आले होते, पावसाची शक्यता होती, कुंद हवेमुळे अजूनच उकडत होते.
तुमानीच्या खिशातून रुमाल काढला घाम पुसत वाट ओलांडत होतो, इतक्यात कोणीतरी आरे कुलकरण्या अशी हाक मारली, समोरची वाहने चुकवत मी वळून बघितले तर मंदया दुडक्या चालीने माझ्यावर चालून येत होता.
कर्कश्य पोंगा वाजवत येणारे वाहन माझ्या वहाणेचा अंगठा घेऊन भर्रर्रर्रर्रर्र कन निघून गेले.
मंदयाला लाखोली वहात कसाबसा बाजूला झालो.
“अरे ऐकलंस का आज ‘टी स्मा’ त मराठी भाषा दिनाचा प्रोग्रॅम आहे बरं का, लक्षात आहे ना? “मी काल फोन केला होता”.
माझा तुटलेला अंगठा, येऊ घातलेला पाऊस, मला असणारी घाई आणि प्रचंड वाहतुकीची कोंडी ह्याचा ह्या मंदयावर काही परिणाम नव्हता, आता हि कोंडी कशी सोडवावी ह्याचा विचार करत होते इतक्यात, परत मंदया “आणि हो मिसेस ना घेऊन ये सगळी फॅमिली, मी बुकिंग करून ठेवले आहे, मराठी ट्रॅडिशनल ड्रेस बरका! विटाऊट फेल”, “प्रोग्रॅम च्या आधी स्नॅक्स पण आहेत”, डोळे मिचकावत स्वारी निघाली.
येतो रे बाबा.. येतो… म्हणत मी चालू लागलो…
“येताना, ग्रोसरी शॉप मधून कुरमुरे आणि रोस्टेड शेंगदाणे आणा, नाही तर नेहमी सारखे विसरताल” इती बायको.
विसराळूपणाचा हा शेरा पुसून काढण्या साठी भडभुंज्याकडून शेरभर कुरमुरे, पसाभर भाजके दाणे आणि “चेंज आणत जा साहेब” हा शेरा घेऊन बाहेर पडलो.
कसाबसा अभिमन्यू सारखा वाहतूककोंडी फोडत आणि मी इमाने इतबारे भरलेल्या कराचे पांग फेडत महापालिकेनं खोदलेल्या रस्त्यातून तुटकी वहाण सांभाळत वाड्यात शिरत होतो, एक गरम गरम चहा कधी घेतोय असे झाले होते.
इतक्यात चिरंजीव आडवे, मी दचकलो आहो एखादवेळी काळी मांजर अगदी सिंव्ह जरी आडवा आला तरी मी निभावेन हो, पण………………. आता हा ‘जनरल डायर’ प्रश्नांच्या सरबत्तीने इथेच ‘जालियनवाला बाग’ करणार आणि घरात व्हिक्टोरिया राणी…….. न बोललेच बरे……. पहिली गोळी सुटणार इतक्यात दाण्याची एक पुडी त्याच्या तोंडात कोंबत मी कसाबसा सुटलो…..
पैरण खुंटीवर टांगता टांगता चहाची बोलणी कशी करावी, तहात काय काय मान्य करावे ह्या विचारात मग्न मागे वळलो आणि एवढ्यांदा दचकलो …… परग्रहावरचा प्राणी… माझ्या घरात? डोक्यावर कसलेसे टोपले घालून आणि चेहऱ्याला रोगण लावून घरभर फिरणारा ह्या प्राण्याला कसे हुसकून लावावे…. अगं…..अगं…..अगं…. बायकोला हाक मारत विचार करत होते…………… इतक्यात नवरा घरी आल्यानंतर दुर्लक्ष करायची जी म्हणून एक खास छटा असते ती त्या प्राण्याच्या चेहऱ्यावर दिसत होती…. अरे बापरे म्हणजे एकतर एलीअन त्यात एलीअन बाई………. बापरे जीव जरा जास्तच घाबरा झाला ……………….
“आहो दचकताय कसले एलीअन बघितल्यासारखे! मीच आहे”.
आं…आं….आं आवंढा गिळत मी कसे बसे विचारले…… “अगं…. हे काय आज नवीन?
“आहो आज डेट काय आहे? आहो असे काय करताय?
आज मराठी भाषा डे आहे ना? आमच्या क्लब मध्ये ठरलंय एकदम नवीन हेअर स्टाईल करून आणि अगदी ट्रॅडिशनल ड्रेस घालून जायचंय, कंपल्सरी आहे, आणि आमच्या क्लब च्या वतीने प्राईझ पण आहे”.
“बरं ते जाऊद्या ती टेबलावरची क्लिप आणि बो पास करा जरा”.
“किचन मध्ये तुमच्यासाठी चहा पण झाकून ठेवलाय, गरम करून घ्या, सांडू नका, जस्ट सगळं क्लीन करून ठेवलंय, हॉल मध्ये सोफ्यावर बसून टीव्ही बघत पिऊ नका. आणि हो उद्या मेड येणार नाहीये, कप वॉश करून ठेवा.”
“आवरा पटकन, आणि प्लीझ ट्रॅडिशनल ड्रेस घाला, पॅन्ट शर्ट नका घालू, कपल ला सुद्धा प्राईझ आहे”.
“ऐकलंत का तुमचे घोणे येणार नाहीयेत, म्हणे सानूचे व्हॅक्सिनेशन आहे आज (नेहमीचेच आहे त्यांचं… कशी काय बाई नवीन नवीन कारणे सुचतात ह्यांना).
आहो ऐकताय का?sss? कार नको टॅक्सी करून जाऊ, दरेकर म्हणत होते पार्किंग चा प्रॉब्लेम आहे तिकडे , पार्किंग शोधण्यात प्रोग्रॅम ची स्टार्ट आणि स्नॅक्स नको मिस व्हायला…. आवरा पटकन आज मराठी डे आहे…. लेट होऊन चालणार नाही…. आणि हो जरा प्रोग्रॅम मध्ये लक्ष्य असुद्या.. त्या पम्या बरोबर कोपरा धरून बसू नका शिक्षा केल्या सारखे (त्याला काय सडाफिटिंग झोटिंग आहे मेला……)
“आहो हँगर वरची साडी जरा पास करा लवकर.
हा हँगर वरचा हँगओव्हर काही उतरणार नव्हता… गपचूप साडी देऊन……. मी पण मग पैरण, तुमान अडगळीत टाकत, बुशशर्ट आणि पॅन्ट च्या मागे दडलेले ट्रॅडीशनल ड्रेस शोधायला कपबोर्ड उघडले….. लेट होउन चालणार नव्हते….. मराठी भाषा डे आहे आज….. उत्कंठा आहे………कितीतरी पागोटे घातलेले गोटे आज दिसणार आहेत….. मोजायला कागद आणि झरणी घ्यावी का या विचारात…… भट साहेबांच्या ओळी आठवल्या……
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
Abhijit Kulkarni