कोरोना भेटला अर्ध्या आयुष्याच्या वळणावर
कोरोना भेटला अर्ध्या आयुष्याच्या वळणावर
प्रश्नचिन्ह उभे करून पूर्ण मानव जातीच्या जगण्यावर
निसर्गाने घेतलेली माणसाची ही परीक्षा
की माणसाच्या हव्यासाचीच ही जणू शिक्षा?
पाहून प्रक्षुब्ध निसर्ग आणि विस्कटलेला मानव
केला मी प्रश्न निसर्गाला का झालास तू दानव?
कोणीच का नाही आज डोळे पुसाया?
कोणीच का नाही आज चिता रचाया?
आज अखेरीस आले निसर्गाचेही उत्तर
मला जाब विचारणारा कोण रे तू बहाद्दर!
युगे उलटली दिसाया मलाच माझी स्वच्छ कांती
तुझ्याच कृत्यांची का तुला पडावी भ्रांती?
स्वतःच्या कैदेने आठव ना प्राणी-पक्ष्यांची व्यथा
तुझ्याच सारखी ती माझी लेकरे नव्हे का?
पाच फुटांचे माणसा-माणसांतील अंतर आज जाणवते तुला
मना-मनांमधले शेकडो फूट अंतर काय माहीत नाही मला?
सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी यांना दिलास का कधी सन्मान?
आज तेच नाहीत का सरसावले पुढे वाचवण्यास तुझे प्राण?
पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना नाहीत का रे त्यांची घरे?
घेतलास का त्यांचा त्याग समजून एकदा तरी बरे?
प्रश्न करून निसर्गाला माझ्याच शब्दांत मी गुंतलो
तूच उपाय सुचव म्हटलं आता मी हरलो
तो वदला, घे आकाशी गवसणी पण ठेव पाय तू जमिनी
बुद्धीचा वापर करताना ठेव जरा ओलावा ही मनी
तनोमनी चराचरी वाहू दे स्वच्छतेचे वारे
भिऊ नकोस होईल लवकर ठीक सारे
असेल तेव्हा कुणीतरी डोळे पुसाया
गरज का पडावी कुणाची चिता रचाया?
कवी – संदेश ग. पंगेरकर (उर्फ श्री)
शब्द हे एक उत्तम माध्यम आहे मनातले सांगण्यासाठी
आणि उत्कृष्ट शब्दालांकर एक खूप अशी सुंदर काव्य निर्माण करतात हे सदैव लक्षात राहतात
अभिनंदन … तू केलेल्या सुंदर कविते बद्दल