माझी आई – करुणा नितीन कुल

माझी आई


प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधू आई !

माझी आई सौ. सावित्री काळोखे खूप साधी व्यक्ती. तिचे बालपण मुंबईमध्ये गेलं.  लग्न होऊन ती तळेगाव ह्या छोट्याश्या गावी आली. मुंबापुरी समोर तळेगाव म्हणजे अगदीच खेड. कसे कोण जाणे पण जीवनातील हा मोठा बदल तिने हसत हसत स्वीकारला. आपल्या मुंबईतील आयुष्याला खो देऊन ती ह्या छोट्याश्या गावात साखरेसारखी विरघळून गेली. तसा तो तिचा स्वभावच. जीवनातील प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणांना ती हसत हसत सामोरे जाते. कोणत्याही गोष्टीचा तीने कधी बाऊ केला नाही.
मुंबईमध्ये विभक्त कुटुंबात वाढलेली ती लग्नानंतर एका मोठया कुटुंबात आली. सात दीर,  सहा नणंदा,  सासू,  सासरे असा मोठा बारदाना.  एवढ्या मोठया खटल्याच्या घरात सगळ्यांशी ती नेहमीच हसतमुख राहिली. लग्नाआधी चार लोकांसाठी कुकरमध्ये भात शिजवणारी,   मोठया हंड्यात पन्नास लोकांसाठी नकळत भात शिजवू लागली. लहानपणी फक्त मामाच्या गावाला शेती पाहिलेली,  सराईतपणे सासू व जावांच्या खांद्याला खांदे लावून शेतीची कामे करू लागली. अगदी कोवळ्या वयात तिच्यावर येऊन पडलेल्या जबाबदाऱ्या तिने लीलया पार पाडल्या. प्रत्येक प्रसंगाला तिने हसत हसत तोंड दिले. पण आपल्या स्वभावाप्रमाणे तिने कधीही माघार घेतली नाही.  माहेरच्या आठवणीने कधी कधी डोळ्यांच्या कडा काही क्षणांसाठी ओल्या झाल्या असतील,  एवढेच काय ते दुःख; पण ते दुःख ती कधी कुरवाळत बसली नाही.
त्याग आणि संयम ह्यांचं कंकण तिने लग्न झाल्या दिवशीच बांधले. जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी हसत हसत सामोरे जायचं जेणेकरून समोरच दुःखच चाट पडावं,  ही तिची शिकवण. आम्हा बहिणींना तिच्याकडून अमूल्य अशी संस्काराची शिदोरी मिळाली आहे.
माझ्या,  किंबहुना मुलींच्या शिक्षणाला आमच्या घरातून खूप विरोध होता,  पण तिने माघार घेतली नाही. ती व माझे वडील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आम्हा दोघी बहिणींना इंजिनीअर बनवले.  आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच
आम्हा बहिणींना तिने काहीही कमी पडू दिले नाही. आपल्या लेकी सुखी व्हाव्या हे एकच स्वप्न तिचा डोळ्यांनी नेहमी पाहीले. आमच्या सुखासाठी तिने स्वतःच्या सुखाला नेहमीच मुरड घातली.  आजूबाजूच्या सर्व नातेवाईकांप्रमाणे आपलेपण एक मोठे घर असावे हे तिचं स्वप्न तिने हृद्याच्या खोल कप्प्यात लपवून ठेवलं. तिने नेहमी आमच्या शिक्षणाला प्राधान्य दिल. शिक्षण पूर्ण करून आम्ही जेव्हा आमच्या पायावर उभे राहिलो तेव्हा कुठे तिने आपलं घराचं स्वप्न पूर्ण केलं.  तो दिवस तिच्या व माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण होता. त्यावेळी जरी मी भारतात नसले तरी तिचा तो आनंद,  ते समाधान मी साता समुद्रापार बसून अनुभवू शकत होते.
माझ्या आईला रेडिओ ऐकायला फार आवडतो आणि फक्त  विविध भारती ही वाहिनी. आजतागायत मनोरंजन क्षेत्रात खूप क्रांती झाली पण ती मात्र रेडिओच्या विविध भारती वाहिनीशी एकनिष्ठ आहे. संगीत ही ईश्वराची शक्ती आहे. संगीतामुळे आनंद मिळतो,  ऊर्जा मिळते,  मनःशांती मिळते. आमच्या दिवसाची सुरवात पहाटे रेडिओवरच्या भक्ती गीतांनी व्हायची त्यामुळे आपसूकच संपूर्ण दिवस एकदम ताजातवाना जायचा. आजही तिचा रेडिओ सदैव चालू असतो. तिच्यामुळे आम्हालाही संगीत ऐकण्याची गोडी निर्माण झाली आहे.
लग्नानंतर मुंबईमध्ये माझी नोकरी व संसार अशी तारेवरची कसरत सुरु असायची. तेव्हाही तिने आम्हाला अनेक वेळा साथ दिली. लेकीच्या पाळणाघरात कधी अडचण असेल,  कधी माझी लेक आजारी असेल तर रात्री एक फोन केला कि तळेगावहुन पहाटे सिंहगड पकडून,  सकाळी ती पदर खोचून आम्हाला मदत करायला हजर असायची. हे सगळं अगदी निरपेक्षपणाने! असा हक्क ह्या जगात आपण फक्त आपल्या आईवरच दाखवू शकतो.
ह्या वयातही ती नेहामीच हसतमुख असते. आयुष्यातील प्रत्येक क्षण ती निखळ आनंदाने घालवत असते. कोणाविषयी ती मनात किंतु ठेवत नाही. पुढे जात राहते.
जीवन गाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे
हेच तिचा सुखी आयुष्याचे गमक आहे आणि आम्हालाही तिने हिच शिकवण दिली आहे.
‘स्वामी तिन्ही जागाच, आईविना भिकारी’ हे स्वामी विवेकानंदांचे काव्य अगदी खरे आहे. एखाद्याजवळ खूप धन आहे पण मायेने हात फिरवणारी आई नसेल तर सगळे व्यर्थ आहे. आई मला ठाऊक आहे मी तुझं ऋण कधीही फेडू शकत नाही. मी सदैव तुझी ऋणी राहील. तू जे सगळं आमच्यासाठी आजतागायत केल आहेस त्यासाठी शतशः धन्यवाद!!!
 
करुणा नितीन कुल
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top